स्टेट बँक नुकसानीत : सेन्सेक्स 171 अंकांनी घसरला
वृत्तसंस्था / मुंबई
शेअर बाजारात घसरणीचे सत्र सलग दुसऱया दिवशी पहावयास मिळाले आहे. दिवसभरातील कामगिरी दरम्यान बँकिंग क्षेत्रातील समभाग विक्रीमुळे सेन्सेक्सने 171.43 अंकांची घसरण नोंदवत बाजार बंद झाला असून निफ्टीतही 39 अंकांची घसरण नोंदवली गेली आहे. तसेच बाजारामध्ये फार्मा, धातू आणि वाहन क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात तेजीची नोंद करण्यात आली आहे.
प्रमुख कंपन्यांच्या जोरावर दिवसअखेर सेन्सेक्स 171.43 अंकांनी घसरुन निर्देशांक 38,193.92 वर बंद झाला. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 39.35 अंकांनी घसरुन निर्देशांक 11,278.00 वर बंद झाला. जागतिक पातळीवरील संकेतामुळे सकाळीच बीएसई 376.79 अंकांनी घसरल्याचे पहावयास मिळाले.
दिवसभरात पीएसयू आणि बँकिंग समभागातील विक्रीचा देशातील बाजारावर मोठा प्रभाव राहिला. सरकारी क्षेत्रातील कंपनी ओएनजीसी, गेल आणि कोल इंडियाचे समभाग तीन टक्मक्मयांची घसरण नोंदवत बंद झाले आहेत. तसेच बँकिंग क्षेत्रात स्टेट बँक, फेडरल बँक आणि आरबीएल बँकेचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. दुसरीकडे अन्य कंपन्यांमध्ये टाटा स्टील 3.57, झी एन्टरटेन्मेंट 3.06, सिप्ला 2.73, रिलायन्स इंडस्ट्रीज 2.68, ग्रासिम 2.39 टक्के आदींचे समभाग तेजीत राहिले आहेत.
बाजारातील 94 कंपन्यांचे समभाग एक वर्षाच्या उच्चांकी पातळीवर राहिले आहेत तर 51 कंपन्यांचे समभाग हे एक वर्षाच्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत. यातील 283 कंपन्यांच्या समभागांना लोअर सर्किट लागले आहे. जगातील महत्वाच्या शेअर बाजारात कोरोनाच्या वाढत्या प्रभावाचा परिणाम राहिल्याने बाजार घसरणीत राहिले आहेत. यामध्ये अमेरिका, चीनचा शांघाय कंपोझिट, ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्सचे बाजार घसरणीसोबत बंद झाल्याची नोंद करण्यात आली आहे. आगामी काळातही शेअर बाजाराचा प्रवास दबावात राहणार असल्याचे संकेत आहेत.








