आली! आली! अखेर कोरोनावरची लस आली! रशियाच्या अध्यक्षांनी तशी घोषणाही केली. तिच्या काही चाचण्या अद्याप बाकी आहेत असे म्हणतात. खरे की खोटे कोणास ठाऊक. पण लस निदान तयार तरी झाली, चाचण्या बाकी असतील तर होतील. पण लस लवकरच येईल. ही नसेल तर दुसरी एखादी येईल.
लशीचे हे शुभवर्तमान वाचल्यापासून आमच्या सकारात्मक नेत्रांसमोर पुढील गोड दृश्ये दिसायला सुरुवात झाली आहे. सरकार गावोगावच्या आरोग्य केंद्रात लस उपलब्ध करून देईल. मग अमिताभराव टीव्हीवर जाहिरातीतून लस घेण्याचे आवाहन करतील. बस दो बुंद… फिर कोरोना से डरो ना… अर्थातच या जाहिरातीचा अतिशय अशुद्ध मराठीत केलेला अनुवाददेखील ऐकायला-बघायला मिळेल. त्याऐवजी आम्ही शुद्ध मराठी जाहिरातीचा मसुदा सुचवीत आहोत. श्रीयुत दादासाहेब कोंडके यांच्या सिनेमातले गाणे बदलून वापरता येईल. ‘आला थंडीचा महिना, झटपट शेकोटी पेटवा, मला लागलाय खोकला, कोविडची लस कोणी चाटवा.’
पुढारी लोक आपापल्या पक्षश्रे÷ाrंच्या जयंती-पुण्यतिथी-वाढदिवसानिमित्त किंवा निवडणुकीच्या उंबरठय़ावर आचारसंहिता सुरू व्हायच्या आधी पूर्वी रक्तदान, नेत्रतपासणी आणि चष्मे वाटपाची शिबिरे आयोजित करायचे. आता लसीकरण शिबिरे आयोजित करतील, त्याचवेळी स्वतःचे नाव छापलेले मास्कदेखील मोफत वाटतील. म्हणजे मग मास्क लावणाऱयांच्या ओठांवर आपोआप त्या नेत्याचे नाव येईल! मनपाच्या निवडणुकीला पाचसहा महिने उरलेले असताना मकर संक्रांत आली की वॉर्डावॉर्डातील लेडीज नेत्या भगिनींना हळदीकुंकवाला बोलावतात. तिळगुळाबरोबर वाण म्हणून त्याही रंगीबेरंगी मास्क वाटू शकतील.
कोरोनावर एकदाची मात करून झाली की गावागावात सार्वजनिक भिंतींवर पुढील घोषणा रंगवता येईल,
‘कोरोनाचा रोगी कळवा आणि हजार रुपये मिळवा.’
एवढे सगळे झाल्यावर तरुणाई मागे कशी राहील. वाहनांच्या मागच्या बाजूला वेगवेगळय़ा कविता, घोषणा आणि शेरोशायरीचे नमुने अवतरतील – ‘बघतोस काय रागानं, लस टोचून घेतलीय वाघानं.’ ‘गर्वच नाही, माज आहे, लस टोचून घेतल्याचा.’
‘अनारकली, इंजेक्शन लेके चली.’
‘भाऊसमोर खोकला, त्याला इंजेक्शन ठोकला.’
‘चलती है गाडी, उडती है धूल, कोरोना की लस लेने को मत भूल.’ ‘वाट पाहीन, पण लस टोचूनच घेईन.’
‘खोका, परंतू प्रेमाणे.’








