फ्रेंडशिप बॅण्ड 10 ते 50 रुपयांपर्यंत तर राख्या वेगवेगळय़ा प्रकारात 10 ते 300 रुपयांपर्यंत उपलब्ध
प्रतिनिधी /बेळगाव
मैत्री या शब्दामध्ये मोठी ताकद आहे. आपुलकी, त्याग आणि समर्पण यासारख्या अनेक गोष्टींचे मिश्रण म्हणजे मैत्री. मैत्री दिन ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा करण्यात येतो. यालाच इंग्रजी भाषेत ‘फ्रेंडशिप डे’ असेही म्हणतात. या फ्रेंडशिप डे च्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ सज्ज असलेली पाहायला मिळत आहे. यंदा ऑगस्टच्या एक तारखेलाच रविवार असल्याने सर्व मित्रमंडळी एकत्रित येऊन एकमेकांना फ्रेंडशिप बॅण्ड बांधून या दिनाचा आनंद द्विगुणित करणार असल्याने बाजारपेठेत नानाविध प्रकाराचे बॅण्ड्स उपलब्ध झाले आहेत. तसेच रक्षाबंधनानिमित्त राख्यांचेदेखील आगमन झाले आहे. मात्र यंदा फ्रेंडशिप बॅण्ड्सची म्हणावी तितकी विक्री झाली नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
अवघ्या दोन दिवसांवर प्रेंडशिप डे येऊन ठेपला असला तरी युवावर्ग बॅण्ड्स खरेदी करण्यासाठी इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे. सध्या शाळा, कॉलेजीसमध्ये ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती नसल्याने विपेत्यांच्या सीझनवर पाणी फिरले आहे. दरवर्षी आपल्या मित्र-मैत्रिणींना प्रेंडशिप बॅण्ड्स घेण्यासाठी बाजारात युवावर्गाची गर्दी दिसून येते. मात्र यंदा कोरोनाचा धोका लक्षात घेऊन पालकांनीदेखील आपल्या मुलांना बाजारपेठेत पाठविण्याचे धाडस केले नसल्याचे दिसून
आले.
लहान फ्रेंडशिप बॅण्ड रिबिन 10 ते 50 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत तर मोठे रिबिन 30 ते 100 रुपयांपर्यंत आहेत. तसेच वेगवेगळय़ा आकारात आणि डिझाईन्समध्येदेखील प्रेंडशिप बॅण्ड्स उपलब्ध असून त्याच्या किमती 40 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत आहेत. रक्षाबंधन सणासाठी अजून अवधी असल्याने राख्यांच्या खरेदीला अद्याप उधाण आले नाही. मात्र परगावात, परराज्यात असलेल्या आपल्या भावाला राखी वेळेवर पोहचावी, यासाठी बहिणी आतापासूनच राख्यांची खरेदी करून कुरिअरने पाठवत आहेत. यावषी राख्यांमध्ये वेगवेगळे प्रकार पाहायला मिळत आहेत. तसेच त्यांची किंमत 10 ते 300 रुपयांपर्यंत आहे. प्रेंडशिप डे आणि रक्षाबंधनानिमित्त बाजारपेठ राख्यांनी आणि बॅण्ड्सनी सज्ज झाली आहे. तसेच विपेतेदेखील ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत.
सोशल मीडियाच्या माध्यमातून होणार शुभेच्छांचा वर्षाव
मैत्री करण्यासाठी फ्रेंडशिप डे हवा असे नाही तर मैत्री कधीही, कोठेही आणि कोणाशीही होऊ शकते. मैत्री करण्यास वयाचे बंधन नसते. अगदी बालचमूंपासून ते वयोवृद्धांपर्यंत कोणाशीही आपली मैत्री सहजरित्या होते. मैत्रीचे नातेसंबंध दृढ करण्यासाठी कोणत्याही धाग्याची आवश्यता नाही. परंतु पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करीत फ्रेंडशिप बांधण्याची प्रथा आपल्याकडेही रुजू झाली आहे. मात्र आता मित्र-मैत्रिणी एकमेकांना वर्षानुवर्षे न भेटतादेखील फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सऍप, स्नॅपचाट यासारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून संदेश पाठवून, स्टेटसवर फोटो ठेऊन मैत्रीला उजाळा देऊन आठवण जपणार आहेत.









