ऑनलाईन टीम / पॅरिस :
फ्रान्समधील प्रस्तावित सुरक्षा कायद्यांविरोधात सलग दुसऱ्या आठवड्यात निदर्शने करण्यात आली. यावेळी ब्लॅक ब्लॉक या अराजकवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हिंसाचारात 65 सुरक्षा रक्षक आणि अधिकारी जखमी झाले आहेत. याप्रकरणी 95 जणांना अटक करण्यात आली आहे.
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आणलेले नवीन सुरक्षा कायदे मंजुरीसाठी संसदेपुढे ठेवण्यात आले आहेत. मात्र, या कायद्यांना नागरिकांचा कडाडून विरोध आहे. नागरिक या कायद्यांविरोधात दर आठवड्याच्या अखेरीस मोठया प्रमाणावर रस्त्यावर उतरून निदर्शने करत आहेत. रविवारी जॅकेट घातलेल्या असंख्य अराजकवाद्यांनी मात्र पोलिसांवर वेगवेगळ्या वस्तूंचा मारा केला. दुकानांची नासधूस, मोटारींची तोडफोड असे प्रकार घडले.
मागील आठवड्यात जवळपास दीड लाख लोकांनी निदर्शने केली होती. या आठवड्यात मात्र त्यांची संख्या निम्म्याहून अधिक घटली. रविवारी केवळ 53 हजार लोक या निदर्शनांमध्ये सामील झाले होते, अशी माहिती अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाकडून देण्यात आली.









