26 देशांमध्ये कार्यरत इस्लामिक धर्मादाय संस्थेवर बंदी
वृत्तसंस्था/ पॅरिस
फ्रान्समध्ये इतिहासाच्या शिक्षकाच्या हत्येनंतर सरकारने धार्मिक कट्टरवाद जोपासणाऱया संस्थांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. बाराकासिटी नावाची एक कथित इस्लामिक धर्मादाय संस्था बुधवारी बंद करण्यात आली आहे. ही संस्था 26 देशांमध्ये सुमारे 20 लाख लोकांसाठी काम करत होती. इस्लामिक कट्टरवादावर कठोरपणे प्रहार करणार असल्याचे फ्रान्स सरकार आणि अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी म्हटले आहे.
फ्रान्स सरकारने त्वरित प्रभावाने बंदी लागू केल्याचे बाराकासिटी या संस्थेने ट्विट करत सांगितले आहे. राजनयिक आश्रय मिळणाऱया देशातून आता काम करणार असल्याचे म्हणत संस्थेचे संस्थापक इदरिस शिमेदी यांनी तुर्कस्तानच्या अध्यक्षांकडून मदत मागितली आहे.
द्वैष फैलावत होती संस्था
फ्रान्स सरकारने योग्य निर्णय घेतला आहे. बाराकासिटी फ्रान्समध्ये द्वेष, इस्लामिक कट्टरतावाद फैलावत होती. दहशतवाद्यांच्या कृत्याचे बाराकासिटीकडून कौतुक केले जात होते. अशाप्रकारच्या संस्थेला या देशात राहण्याचा अधिकार नसल्याचे फ्रान्सचे गृहमंत्री गेराल्ड डारमेनियन यांनी म्हटले आहे. परंतु संस्थेने गेराल्ड यांचे आरोप फेटाळले आहेत. फ्रान्सच्या गुप्तचर यंत्रणांकडे आमच्याविरोधात कुठलाच पुरावा नसल्याचे संस्थेने म्हटले आहे. संस्थेचे संस्थापक शिमदी यांना काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती.
इम्रान यांचे आवाहन
पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी मुस्लीम देशांच्या प्रमुखांना एक पत्र लिहिले आहे. फ्रान्समध्ये मुस्लिमांच्या विरोधातील प्रकार हा जगात इस्लामोफोबिया फैलावण्याचा कट आहे. याच्या विरोधात सर्व मुस्लीम देशांनी एकजूट होण्याची गरज आहे. याची युरोपमध्ये विशेष आवश्यकता असल्याचे इम्रान यांनी म्हटले आहे.









