वृत्तसंस्था/ पॅरिस
फ्रान्समध्ये कोरोना संक्रमणाची पाचवी लाट पाहता तेथील सर्व नाइट क्लब चर आठवडय़ांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारपासून हा निर्णय लागू होणार आहे. फ्रान्सचे पंतप्रधान जीन कास्टेक्स यांनी ही घोषणा केली आहे.
या वीकेंडपासून चार आठवडय़ांसाठी नाइट क्लब बंद करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. हा निर्णय जानेवारीच्या प्रारंभापर्यंत लागू राहणार आहे. लस घेऊनही विषाणू तरुण-तरुणींमध्ये अधिक वेगाने फैलावत असल्याने आम्ही हा निर्णय लागू करत आहोत असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
फ्रान्समध्ये 16 महिन्यांनी जुलैमध्ये सर्व नाइट क्लब्स सुरू करण्यात आले होते. मार्च 2020 मध्ये लॉकडाउन लागू केल्यावर कोरोना संक्रमणामुळे नाइट क्लब्सवर निर्बंध घालण्यात आले होते. हे नाइट क्लब पुन्हा सुरू करणे फ्रान्स्च्या महामारी निर्बंध हटविण्याच्या प्रक्रियेचा अंतिम टप्पा होता.
कोरोनाचा नवा व्हेरियंट जगातील अनेक देशांमध्ये फैलावलेला आहे. फ्रान्समध्ये देखील याचे रुग्ण सापडले आहेत. जानेवारीच्या अखेरपर्यंत पूर्ण फ्रान्स कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे संकटात सापडू शकतो असे वैज्ञानिकांचे मानणे आहे. तर पहिला रुग्ण सापडताच फ्रान्स आणि अमेरिकेतील प्रशासनाने अनेक निर्बंध लागू केले आहेत.









