प्रतिनिधी/ फोंडा
फोंडय़ातील रखडलेला मलनिस्सारण प्रकल्प म्हणजे जनतेच्या पैशांची निव्वळ उधळपट्टी आहे. या प्रकल्पावर आत्तापर्यंत रु. 536 कोटींचा नियोजित खर्च दाखविण्यात आला असून जमीन हस्तांतरीत करण्यापूर्वीच प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यात मोठा आर्थिक घोटाळा आहे. दक्षता खात्यामार्फत किंवा गरज भासल्यास सीबीआयकडून या प्रकल्पाची चौकशी करण्याची मागणी फोंडय़ाचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश द्यावेत असेही रवी नाईक यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. फोंडा पालिका क्षेत्र, कुर्टी पंचायत क्षेत्र तसेच कवळे व बांदोडा पंचायत क्षेत्रात सध्या या मलनिस्सारण प्रकल्पाचे काम सुरु आहे. आतापर्यंत एकूण रु. 536 कोटी या प्रकल्पावर खर्च दाखविण्यात आला असून निधी अभावी हा प्रकल्प रखडलेला आहे. प्रत्यक्षात 2016 साली या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले होते व एप्रिल 2018 पर्यंत तो पूर्ण व्हायला हवा होता. दोन वर्षांचा नियोजित कार्यकाळ संपून आता चार वर्षे उलटली तरी हा प्रकल्प पूर्णत्वास आलेला नाही. या प्रकल्पासाठी खोदलेल्या रस्त्यांची अद्याप दुरुस्ती करण्यात आलेली नाही. एका बाजूने प्रकल्पावरील खर्च वाढत आहे, तर दुसरीकडे तो कधी पूर्णत्वास येईल हेही सरकार ठामपणे सांगू शकत नाही, असे रवी नाईक म्हणाले.
जमिन ताब्यात घेण्यापूर्वीच निधी कसा मंजूर झाला ?
कवळे पंचायत क्षेत्रात 15 एमएलडी क्षमतेच्या प्रकल्पावर आत्तापर्यंत रु. 36 कोटी खर्च दाखविण्यात आला आहे. प्रकल्पासाठी अजून 75 चेंबर्स खोदणे बाकी आहेत व त्यासाठी 2021 पर्यंत मुदत वाढवून घेण्यात आली आहे. वास्तविक 2018 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे होते. कुर्टी येथील 8 एमएलडी प्रकल्पावर रु. 19 कोटी खर्च दाखविण्यात आला असून ठिकठिकाणी स्थानिक नागरिकांनी केलेल्या विरोधामुळे प्रकल्पाचे काम रखडल्याचे सांगितले जाते. बांदोडा येथे स्थानिकांकडून असाच विरोध होत आहे. त्यात मुळात सरकारचीच चूक असून जमीन ताब्यात घेण्यापूर्वीच प्रकल्पाचे काम सुरु करण्याची कुणाला घाई झाली होती? प्रकल्पासंबंधी आवश्यक प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच निधी कसा मंजूर झाला असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. या प्रकल्पावर झालेला अतिरिक्त खर्च व तो पूर्ण होण्यास झालेला विलंब यामागे मोठा घोटाळा असून त्यात गुंतलेल्यांवर खटले भरण्याची मागणीही आमदार रवी नाईक यांनी केली आहे.
आयआयटी प्रकल्प भूतखांब केरी पठारावर हलवा
सत्तरी तालुक्यातील शेळ मेळावली येथे ग्रामस्थांचा प्रखर विरोध असलेला आयआयटी प्रकल्प भूतखांब केरी पठारावर हलविण्याचा पर्यायही त्यांनी मांडला. स्थानिक शेतकऱयांच्या सुपिक जमीनी व उत्पन्न धोक्यात आणून हा प्रकल्प सत्तरीतच उभारण्याचा अट्टाहास योग्य नाही. केरी फोंडा येथील भूतखांब पठारावर एसईझेडसाठी सरकारने ताब्यात घेतलेली लाखो चौरस मिटर खडकाळ जमीन उपलब्ध आहे. या जागेत हा प्रकल्प उभारणे शक्य आहे. मात्र स्थानिकांना रोजगाराची हमी देण्याच्या अटीवरच हा प्रकल्प उभारावा, असे रवी नाईक यांनी सांगितले.









