एसआरके सेवा केंद्राचे फोंडय़ात उद्घाटन
प्रतिनिधी /फोंडा
भाजपाचा आपण निष्ठावंत कार्यकर्ता असून गेली 21 वर्षे पक्षासाठी निस्वार्थीपणे काम केले. मागील निवडणुकीत आपण तडजोड केली. मात्र यंदा फोंडा मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवारीवर आपला शंभर टक्के दावा आहे. पक्षही त्याचा गांभीर्याने विचार करेल, अशी प्रतिक्रिया कुर्टी-खांडेपार पंचायतीचे माजी सरपंच व भाजपाच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य संदीप खांडेपारकर यांनी दिली आहे.
संदीप खांडेपारकर यांनी फोंडा शहरात सुरु केलेल्या एसआरके सेवा केंद्राच्या उद्घाटन सोहळय़ाप्रसंगी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. फोंडय़ातील ज्येष्ठ डॉक्टर अनिल गावणेकर यांच्याहस्ते काल सोमवारी सायंकाळी शांतीनगर रोडवरील शिवम शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये या सेवा केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी निवृत्त निबंधक पंढरीनाथ बोडके, कुर्टी-खांडेपारचे माजी सरपंच गुरुदास खेडेकर, नगरसेवक यतीश सावकार, तुकाराम नाईक तसेच संदीप खांडेपारकर यांचे कार्यकर्ते व चाहते उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून हे सेवा केंद्र सुरु करण्यात आले.
रवी नाईक यांच्या अनुभवाचा भाजपाला फायदा
फोंडय़ाचे माजी आमदार व माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्या भाजपाच्या प्रवेशाबद्दल बोलताना, पक्षाच्या या निर्णयाचे स्वागतच आहे. रवी नाईक यांना राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्याचा पक्षाला निश्चितच फायदा होईल, असे ते म्हणाले. मागील निवडणुकीत फोंडय़ातून आपली उमेदवारी निश्चित होती. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी त्यावेळी पुढील निवडणुकीत उमेदवारी देण्याची हमी दिल्याने आपण तडजोड केली. मात्र यावेळी माघार नाही. पक्षाने उमेदवारी नाकारल्यास स्वतंत्र लढायचे की, अन्य पर्याय निवडायचा हे आत्ताच सांगणे घाईचे होईल. असेही खांडेपारकर यांनी स्पष्ट केले.
अर्ज भरण्यापासून प्लंबर, ईलेक्ट्रिशियनची सोय
यापूर्वी हे सेवा केंद्र आपल्या खांडेपार गावातून सुरु होते. आता फोंडय़ात ते सुरु केले आहे. छोटय़ामोठय़ा कामांसाठी तसेच सरकारी योजनांसाठी गरीब व गरजू लोकांना मोफत अर्ज भरून देणे, गृआधार, लाडली लक्ष्मी आदी योजनांसाठी आवश्यक दाखले ऑनलाईन मिळवून देणे या सेवेबरोबरच घरातील पाणी व वीज पुरवठा खंडित झाल्यास आयत्यावेळी नागरिकांना मोफत प्लंबर किंवा इलेक्ट्रिशियनची सोय केली जाईल. सकाळी 9 ते सायं. 6 वा. पर्यंत हे सेवा केंद्र सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगतिले.
समाजसेवेची उत्कृष्ट संकल्पना : डॉ. अनिल गावणेकर
सेवा केंद्राला शुभेच्छा देताना डॉ. अनिल गावणेकर यांनी समाजसेवेची ही उत्कृष्ट संकल्पना असल्याचे सांगितले. संदीप खांडेपारकर हे मुळातच दानी व त्यागीवृत्तीचे आहेत. त्यामुळे हे कार्य त्यांच्या हातून उत्तम प्रकारे होईल. आपले सामाजिक उत्तरदायित्व म्हणून या सेवा केंद्रामार्फत येणाऱया रुग्णांना मोफत सेवा देण्याची घोषणाही डॉ. गावणेकर यांनी केली. भाजपाचे काही नगरसेवक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व हितचिंतकांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावून संदीप खांडेपारकर यांच्या या कार्याला शुभेच्छा दिल्या.









