67 ठिकाणाहून 17 वजनकाटय़ासह 90 हजारांचा माल जप्त
प्रतिनिधी/ फोंडा
वजन माप खाते फोंडा विभागातर्फे फेब्रुवारी महिन्यातील 364 ठिकाणी मारलेल्या मेरथॉन धाडसत्रातून लाखो रूपयाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. काल शनिवारी केलेल्या कारवाईत सुमारे रू. 90 हजाराचा माल व 17 नुतनीकरण न करण्यात आलेले वजनकाटे जप्त करण्यात आले. फोंडा टिमतर्फे बांदोडा, उंडीर, दुर्भाट व फोंडा मार्केट परिसरात एकूण 67 ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.
वजन माप खात्याचे निरीक्षक सुबर्ट डिकॉस्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार 67 जणांवर तक्रारी नोंदविलेल्या आहेत. फोंडा शहरातील राजेंद्र वेर्णेकर सोनारचा वजनकाटा जप्त करण्यात आला आहे. एलपीजी गॅस स्टोव्ह, कुकर, तसेच बांदोडा येथील मिनरल वॉटर कंपनीच्या विना परवाना वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले.
निवडणूक आचारसंहिता आणि वजन माप खात्याचे धाडसत्र
आचारसंहितेच्या कालावधीत राजकीय पुढाऱयाकडून हस्तक्षेप कमी असल्याने फोंडा विभागाने धाडसत्र आरंभलेले आहे. फेंब्रुवारी महिन्यात उसगांव, तिस्क, बाराजण, मारवासडा, पिळये या भागातून सुमारे नुतनीकरण न करण्यात आलेले सुमारे 23 वजनकाटे जप्त करण्यात आले होते. त्यानंतर चार दिवसात सलग दुसरी मोठी कारवाई करताना शिरोडा येथील एका सुपर मार्केट येथे कोणतेही नियम न पाळता पाकीदबंद कडधान्याची विक्री, फर्निचर, किराण दुकान, भाजीविक्री केंद्र अशा विविध दुकानातून कडधान्यासह सुमारे रू. 80 हजाराचा माल जप्त करण्यात आला होता. त्यानंतर काल शनिवारी केलेल्या धडक कारलवाईतून सुमारे 90 हजारांचे साहित्य जप्त करण्यात आले. वजन माप खात्याचे अधिकारी प्रसाद शिरोडकर, अरूण पंचवाडकर, देमू मापारी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शुबर्ट डिकॉस्ता यांच्या टिमने ही कारवाई केली.









