सदानंद तानावडे यांचे प्रतिपादन, फोंड्यात भाजपा पॅनेलचे उमेदवार जाहीर
प्रतिनिधी/ फोंडा
डबल इंजिन सरकारमुळे केंद्र सरकारच्या सहकार्याने गोव्याचा जसा विकास होत आहे, त्याचप्रमाणे फोंडा नगरपालिकेवर भाजपाची सत्ता आल्यास फोंडा शहराचा अधिक चांगल्या प्रकारे विकास होईल. त्यासाठी फोंडा पालिकेवर भाजपा पुरस्कृत फोंडा नागरिक समितीच्या सर्व तेराही उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी केले.
येत्या 5 मे रोजी होणाऱ्या फोंडा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे पॅनेल जाहीर केल्यानंतर तानावडे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कृषिमंत्री तथा फोंड्याचे आमदार रवी नाईक, राज्यसभा खासदार व फोंडा पालिका निवडणुकीचे प्रभारी विनय तेंडुलकर यांच्या उपस्थितीत शनिवारी सकाळी खडपाबांध येथील रवी नाईक यांच्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला. राज्यातील कुंकळ्ळी सोडून इतर सर्व बाराही नगरपालिकांवर भाजपाची सत्ता आहे. येणाऱ्या निवडणुकीत फोंडा व सांखळी नगरपालिकांवरही भाजपाचा झेंडा फडकणार असल्याचे तानावडे म्हणाले. फोंडा पालिकेच्या 15 प्रभागांपैकी विश्वनाथ दळवी व विद्या पुनाळेकर हे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित 13 जागांवरील उमेदवारांना निवडून आणण्यासाठी पक्ष व सरकार पूर्ण सहकार्य करणार आहे. फोंडा शहराच्या विकासासाठी मतदार भाजपाला पाठिंबा देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मगो पक्षाशी युती नाही, भाजप स्वबळावर लढणार !
फोंडा पालिकेच्या निवडणुकीत भाजप विरोधात मगो पक्षाने आपले पॅनेल उभे केले आहे. मात्र भाजपा फोंडा पालिकेच्या सर्व जागा स्वतंत्रपणे लढणार आहे. राज्यात भाजपची मगोसोबत युती नाही, तर या पक्षातील आमदारांनी सरकारला पाठिंबा दिलेला आहे. फोंड्यात स्थानिक आमदार भाजपाचा आहे. त्यामुळे सर्व जागा लढविणे आमचा अधिकार आहे, असे युतीसंबंधी बोलताना तानावडे यांनी स्पष्ट केले. फोंड्याचे आमदार तथा कृषिमंत्री रवी नाईक व प्रभारी विनय तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखालीच ही निवडणूक लढविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
फोंड्याच्या विकासासाठी सहकार्य करा : रवी नाईक
फोंडा पालिका क्षेत्रामध्ये मास्टर प्लॅनच्या कामाला सुरुवात झाली आहे. नियोजित प्रकल्पही निवडणुकीनंतर मार्गी लागतील. विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही ही निवडणूक लढवित असून भाजपाच्या सर्व उमेदवारांना मतदार निवडून देतील असा विश्वास मंत्री रवी नाईक यांनी व्यक्त केला. तानावडे यांनी यावेळी भाजपाच्या उमेदवारांची यादी जाहीर केली.
13 उमेदवारांची यादी जाहीर : दोघे बिनविरोध
शांतीनगर प्रभाग 1 : रॉय रवी नाईक, कुरतरकर नगरी प्रभाग 2 : वीरेंद्र ढवळीकर, सांताव्रुज प्रभाग 3: ज्योती अरुण नाईक, यशवंतनगर प्रभाग 4 : संदीप आमोणकर, दाग खडपाबांध प्रभाग 5: रितेश रवी नाईक, खडपाबांध प्रभाग 6: शौनक बोरकर, खडपाबांध प्रभाग 7: विश्वनाथ दळवी (बिनविरोध निवड), वारखंडे प्रभाग 8: विद्या नितीन नाईक, शांतीनगर सुपर मार्केट प्रभाग 9: रुपक देसाई. दुर्गाभाट, वरचा बाजार प्रभाग 10: दीपा शांताराम कोलवेकर, पंडितवाडा प्रभाग 11 : कु. प्रियांका नवनाथ शेट पारकर, सिल्वानगर प्रभाग 12 : अशित वेरेकर, दुर्गाभाट प्रभाग 13 : विद्या पुनाळेकर (बिनविरोध निवड). तळे, दुर्गाभाट प्रभाग 14 : आनंद नाईक, शांतीनगर प्रभाग 15 : कु. संपदा किशोर नाईक.









