वीज खांब कोसळून एकाचा बळी : वारा व सतत कोसळणाऱया पावसामुळे पडझड सुरुच.फोंडा शहरांसह बहुतेक गावे अंधारात
प्रतिनिधी / फोंडा
रविवारी पहाटेपासून सुरु झालेला वादळी वारा व सतत कोसळणाऱया पावसामुळे फोंडा तालुक्यातील विविध गावांमध्ये मोठय़ाप्रमाणात पडझड झाली आहे. या वादळी वाऱयाचा सर्वात जास्त तडाखा जुवारी नदी काठावर असलेल्या पंचवाडी, शिरोडा, बोरी, दुर्भाट-आगापूर, बांदोडा, मडकई, कुंडई, भोम या पंचायत क्षेत्रांना बसला असून वाडी तळावली, कवळे, माशेल व अन्य काही भागातही मोठय़ाप्रमाणात पडझड झाली आहे.
पालसरे-केरी येथे धावत्या दुचाकीवर वीज खांब पडल्याने त्यात किशोर उर्फ केशव जगन्नाथ नाईक (47, रा. पालसरे) याचा मृत्यू झाला तर मागे बसलेला श्याम पोकू नाईक हा जखमी झाला. उंडिर-बांदोडा येथे स्कूटरवर झाड पडल्याने जयराम नाईक हा गंभीर जखमी झाला. रविवारी दिवसभर घोंघावणारे वारे व मुसळधार पावसामुळे संपूर्ण तालुक्यात पडझड सुरु होती.
फोंडा शहरासह अनेक गांवे अंधारात
फोंडा शहरातील खडपाबांध, शांतीनगर यासह अन्य काही भागांना वादळी पावसाचा तडाखा बसला. खडपाबांध व शेजारील कुर्टी भागात मुख्य वीज वाहिनीवर झाडे पडून खांब जमिनदोस्त झाल्याने सकाळपासून रात्री उशिरापर्यंत फोंडा शहर अंधारात बुडाले होते. तालुक्यातील विविध भागांमध्येही मोठय़ाप्रमाणात वीज खांबावर झाडे पडल्याने व वाहिन्या तुटल्याने वीज प्रवाह खंडित झाला आहे. वीज खात्याचे अभियंते तसेच कर्मचारी रविवारचा संपूर्ण दिवस व उशिरा रात्रीपर्यंत दुरुस्तीकामात गुंतले होते. सतत कोसळणाऱया जोरदार पावसामुळे दुरुस्तीकामात व्यत्यय येत असून सोसाटय़ाच्या वाऱयामुळे झाडे कोसळण्याचे सत्र सुरुच आहे.
पणजी-फोंडा महामार्गावरील वाहतूक खोळंबली
रविवारी सकाळी भोम येथे पणजी-फोंडा महामार्गावर आंब्याचे झाडा कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक काहीवेळ खोळंबली. बांबोळी येथील गोमेकॉत जाणारे आरोग्य कर्मचारी तसेच रुग्णवाहिकाही त्यात अडकून पडल्या. कुंडई अग्नीशामक दलाच्या पथकाने नंतर हे झाड बाजूला हटवून रस्ता मोकळा केला. तालुक्यातील विविध गावांमधील मुख्य व अंतर्गत रस्त्यावरही मोठय़ाप्रमाणात झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. ही झाडे हटविण्यासाठी फोंडा अग्नीशामक दलाच्या पथकाची दिवसभर धावपळ सुरु होती.
पडझडीच्या सत्तरहून अधिक घटना
तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरांवर झाडे कोसळल्याने लोकांचे मोठय़ाप्रमाणात नुकसान झाले आहे. दिवसभरात झालेल्या पडझडीच्या सत्तरहून अधिक घटना फोंडा अग्नीशामक दलामध्ये नोंद झालेल्या आहेत. फोंडा व कुंडई अग्नीशामक दलाच्या पथकासह, वीज कर्मचारी, तसेच विविध भागातील सरपंच, पंचसदस्य, तसेच कार्यकर्ते मदतकार्यात गुंतले होते. अग्नीशामक दलाला एकाचवेळी बहुतेक जागी मदतकार्याला पोचणे शक्य नसल्याने कवळे, कुंडई व अन्य गावांमध्ये ग्रामस्थांनीच स्वतः पुढाकार घेऊन स्थानिक पंचसदस्यांच्या मदतीने घरे व रस्त्यांवरील झाडे हटविली.
वादळी पावसामुळे फोंडा तालुक्यातील बऱयाच गावांमध्ये वीज पुरवठा शनिवारी रात्रीपासून खंडित झाला असून अनेक गांवामध्ये मोबाईल नेटवर्कही बंद झाले आहे.
फोंडा शहर तसेच आसपाच्या पंचायत क्षेत्रात मोन्सूनपूर्व काम अद्याप न झाल्याने पावसाच्या या तडाख्यात अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले. कुर्टी बगलरस्त्याच्या सर्विस रोडवर काही ठिकाणी पाणी साचून राहिले होते. सतत कोसणाऱया पावसामुळे उन्हाळय़ात आटलेल्या ओहळ व नाले पाण्याने तुडूंब भरुन वाहू लागले आहेत. कोरोनामुळे सध्या राज्यभर सुरु असलेली संचारबंदी व त्यातच रविवारचा दिवस असल्याने या वादळी पावसाचा वाहतूक व जनजीवनावर फारसा गंभीर परिणाम झाला नाही. मात्र खंडित वीज, कोलमडलेले मोबाईल नेटवर्क यामुळे लोकांची मोठी गैरसोय झाली आहे.









