वृत्तसंस्था/ बेंगळूर
2022 आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फॅफ डय़ू प्लेसिसची रॉयल चँलेजर्स बेंगळूर संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. यापूर्वीचा नियमित कर्णधार विराट कोहलीने नेतृत्वावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर या संघाला नव्या कर्णधाराची प्रतीक्षा होती.
आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये प्लेसिसने आतापर्यंत 2935 धावा जमविल्या आहेत. 2021 आयपीएल हंगामातील अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाविरूद्ध खेळताना त्याने 86 धावा जमविल्या होत्या. त्यावेळी तो सामनावीर पुरस्काराचा मानकरीही ठरला.
जागतिक स्तरावरील या दिग्गज फलंदाजाने मागील आयपीएलमध्ये 16 सामन्यांत 633 धावा जमवित सर्वाधिक धावा जमविणाऱया फलंदाजांमध्ये दुसरे स्थान मिळवले होते. चेन्नई सुपर किंग्जच्या ऋतुराज गायकवाडने गेल्यावर्षी आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा नोंदविल्या. 2016 डिसेंबर ते 2020 फेब्रुवारी दरम्यान फॅफ डय़ू प्लेसिस दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार होता. 2022 आयपीएल हंगामासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरच्या प्रँचायझींनी प्लेसिसला 7 कोटी रूपयांची बोलीवर करारबद्ध केले आहे.









