निकृष्ट दर्जाचे पॅचवर्कमुळे नागरिकांसह माजी नगरसेवक अमोल माने अक्रमक, ठेकेदारासह मनपा अधिकाऱ्यांना सुनावले खड्डेबोल; अधिकाऱ्यांच्या गाडीवर डांबर ओतण्याचा प्रयत्न
कोल्हापूर प्रतिनिधी
आपटेनगर ते फुलेवाडी नाका या फुलेवाडी रिंगरोडवर खड्डय़ाचे साम्राज्य झाले. नागरिकांना येथून वाहन चालविणे सोडाच चालणेही कठीण होवून बसले आहे. खड्डय़ात पडून अपघात होवून जीव गेला तरी महापालिका प्रशासनाला गांभिर्य नसल्याचे येथील निकृष्ट दर्जाच्या पॅचवर्कवरून समोर येत आहे. त्यामुळे शुक्रवारी परिसरातील नागरिकांचा संयमाचा बांध फुटला आहे. ज्येष्ठ नागरिकांसह माजी नगरसेवक अमोल माने यांनी अक्रमक भूमिका घेतली. दर्जदार रस्त्यांसाठी नागरिकांना रूद्रावतार पाहण्यास मिळाला.
फुलेवाडी रिंगरोड गेल्या अनेक वर्षापासून खराब झाला आहे. ठेकेदाराने येथील रस्ता केला मात्र, जुलै आणि ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसात रस्ता आणखीन खराब झाला. रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य झाले आहे. रस्ता मुदत खराब झाल्याने ठेकेदाराकडून दोन दिवसांपासून येथे पॅचवर्क सुरू आहे. कॉमन मॅनचे ऍड. बाबा इंदूलकर यांनी दोन दिवसांपूर्वी येथे निकृष्ट दर्जाचे पॅचवर्कचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आणले होते. बुधवारी ज्येष्ठ नागरिक संघाच्या पाहणीवेळी हाच प्रकार समोर आला. गुरूवारी सकाळी त्यांनी यावरून ठेकेदारासह उपशहर अभियंतांना खडेबोल सुनावले. निकृष्ट दर्जाचे सुरू असणारे पॅचवर्कचे कामही बंद पाडले. नागरिकांची अक्रमक भूमिकेमुळे अधिकाऱयांचीही बोलती बंद झाली. चांगल्या दर्जाचे पॅचवर्क करण्याचे आश्वासनानंतर अखेर वादावर पडदा पडला.
‘पाकीट’ संस्कृती बंद करा
ज्येष्ठ नागरिकांनी महापालिका अधिकाऱयांना सुनावले, निकृष्ट दर्जाच्या पॅचवर्कचा पोलखोल, शहरातील फुलेवाडी रिंग रोडवरील खड्डय़ांमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहे. वारंवार दाद मागूनही महापालिकेचे अधिकारी लक्ष देत नसल्याने गुरूवारी येथील ज्येष्ठ नागरिकांना संताप अनावर झाला. त्यांनी निष्कृष्ट दर्जाच्या पॅचवर्कचा पोलखोल करत रस्त्याचे काम बंद पाडले. थोडी तरी लाज बाळगा… पाकीट संस्कृती बंद करा, अशा शब्दात महापालिकेच्या अधिकाऱयांना सुनावले. अक्रमक झालेल्या नागरिकांनी थेट अधिकाऱयांच्या वाहनावर डांबर ओतण्याचा प्रयत्न केला. यानंतर महापालिकेच्या अधिकाऱयांनी काढता पाय घेतला. दरम्यान, ठेकेदार आणि महापालिकेच्या अधिकाऱयांची चांगलीच कानउघडणी नागरिकांनी केली.
फुलेवाडी रिंग रोडवरील बोंद्रेनगर, गंगाई लॉन व क्रांतीसिंह नाना पाटील नगर परिसरातील रस्त्यांवर खड्डय़ांचं साम्राज्य झाले आहे. या मार्गावरील महापालिकेने खड्डे दोन दिवसांपूर्वी पॅचवर्कने बुजवले होते. मात्र, निष्कृष्ट दर्जाचे पॅचवर्क केल्याने परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघ, भाकप कार्यकर्त्यांसह परिसरातील नागरिकांनी रास्ता रोकोचा इशारा दिला होता. त्यावर गुरूवारी सकाळी ठेकेदार आणि महापालिकेचे अधिकारी नागरिकांची समजूत काढण्यासाठी फुलेवाडी रिंगरोड येथे दाखल झाले. त्यावेळी नागरिकांनी अधिकाऱयांनी ठेकेदारांना चांगलेच धारेवर धरले. केवळ खडी टाकून खड्डे बुजवण्याचे काम केल्याचा आरोप केला. तुमची पाकीट संस्कृती बंद करा, जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवा, अशा शब्दात अधिकाऱयांना सुनावले. त्यावेळी अधिकारी निरुत्तर होऊन. त्या ठिकाणाहून पळ काढला. यावेळी भाकपचे अनिल चव्हाण, बी.एल.बरगे, एकनाथ पोवार, चंद्रकांत बागडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे गजानन विभुते, निवास नलवडे, महादेव पुंडे संजय पाटील, समरजित जगदाळे, सचिन कुबडे, प्रशांत पोवार, सोमनाथ नलवडे, पांडूरंग मोहिते उपस्थित होते.
नागरिक आणि अधिकायांची उद्या बैठक
फुलेवाडी रिंगरोड परिसरातील नागरिक आणि महापालिकांच्या वरिष्ठ अधिकाऱयांची आज शुक्रवारी तीन वाजता बैठक घेण्याचा निर्णय घेतला. या बैठकीत ठोस निर्णय न झाल्यास शुक्रवारी फुलेवाडी रिंगरोडवर रस्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.
फुलेवाडी रिंगरोड बनला मृत्यूचा सापळा
कणेरकरनगर परिसरात मनपा उपजल अभियंताच्या आईचा खड्डयात पडून मृत्यूची घटना ताजी असतानाच पाणी गळतीमुळे कोल्हापूर महानगरपालिकेने बोंद्रेनगर चौकातील पॅचवर्क केलेला खड्डा पुन्हा खोदल्यामुळे बुधवारी रात्री याच खड्डय़ामध्ये परिसरातील हेमा जाधव आणि त्यांची आई घसरून पडल्या. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.