वृत्तसंस्था/ लंडन
कोरोना महामारी संकटामुळे ब्रिटनमधील सर्व क्रीडा प्रकार स्थगित किंवा लांबणीवर टाकण्यात आले होते त्याला फुटबॉलही अपवाद नाही. आता 20 जूनपासून पुन्हा सुरू होणाऱया ब्रिटनमधील द्वितीय विभागीय फुटबॉल स्पर्धेच्या हंगामातील सलामीच्या सामन्यात फुलहॅमची लढत ब्रेंटफोर्डशी होणार आहे, अशी माहिती इंग्लीश फुटबॉल लिगतर्फे देण्यात आली.
सेकंड टियर फुटबॉल स्पर्धेत गुणतक्त्यात दुसऱया स्थानावर असलेल्या वेस्ट ब्रोमिच अलबियॉन यांचा सामना यजमान बर्मिंगहॅम सिटीबरोबर 20 जूनला खेळविला जाईल. 2019-20 च्या इंग्लीश फुटबॉल लिग स्पर्धेच्या उर्वरित वेळापत्रकानुसार या स्पर्धेत आघाडीवर असलेल्या लिड्स युनायटेड संघाचा सामना 21 जूनला कार्डिफ सिटीशी होणार आहे. ही स्पर्धा पुन्हा सुरू झाल्यानंतर पहिल्या आठवडय़ाच्या कालावधीत तीन सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्काय स्पोर्ट्स चॅनेलवर केले जाणार आहे. त्यानंतर पुढील दोन फेऱयांतील निवडक आठ सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल.
इंग्लीश प्रिमियर लिग फुटबॉल स्पर्धेत लिड्स युनायटेड संघाने 37 सामन्यातून 71 गुणांसह पहिले स्थान मिळविले आहे तर वेस्ट ब्रोमिच 70 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे. कोरोना महामारीमुळे स्थगित करण्यात आलेल्या या स्पर्धेतील नऊ फेऱया बाकी आहेत. फुलहॅम तिसऱया, ब्रेंटफोर्ड चौथ्या, नॉटिंगहॅम फॉरेस्ट पाचव्या, प्रेस्टननॉर्थ एंड सहाव्या स्थानावर असून या संघांनी प्ले ऑफमध्ये स्थान मिळविले आहे. चार्लटन ऍथलेटिक, ल्युटॉन टाऊन आणि बार्मस्ले हे तीन संघ शेवटच्या तीन स्थानावर आहेत.









