शहरातील फुटपाथ बनले रोडसाईड मार्केट : नेहरुनगर परिसरात निर्माण केलेल्या फुटपाथ-सायकल ट्रकवर अतिक्रमण
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील पादचाऱयांसाठी फुटपाथ आणि सायकलस्वारांसाठी सायकल टॅकची निर्मिती स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात आली आहे. मात्र फुटपाथचा आणि सायकल ट्रकचा वापर फेरीवाले करीत आहेत. एपीएमसी रोडशेजारी नेहरुनगर परिसरात फुटपाथ आणि सायकल ट्रकवर फळ बाजार निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील फुटपाथ पूर्णपणे गायब झाले असून फुटपाथ पादचाऱयांसाठी की फळविपेत्यांसाठी? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध विकासकामे राबवून स्मार्ट सिटी बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र या योजनेंतर्गत बनविण्यात आलेल्या फुटपाथवर चक्क फेरीवाल्यांनीच ठाण मांडले आहे. शहरातील रस्त्यांची रुंदी कमी करून फुटपाथची रुंदी वाढविण्यात आली आहे. तसेच काही रस्त्यांशेजारी सायकल ट्रक निर्माण करण्यात आला आहे. याकरिता कोटय़वधीचा निधी खर्ची घालण्यात आला आहे. पण शहरातील प्रमुख रस्त्यांसह निर्माण करण्यात आलेल्या प्रत्येक फुटपाथवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे.
एपीएमसी रोडवर नेहरुनगर परिसरात महापालिकेच्यावतीने उभारण्यात येणाऱया व्यापारी संकुलासमोरील फुटपाथवर फळ मार्केट निर्माण झाले आहे. या ठिकाणी सुमारे 10 ते 15 फळ विक्रीचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. सुरुवातीला लहान आकाराचे असणारे हे स्टॉल आता दुकानाप्रमाणे मोठे बनविण्यात आले आहेत.
यापूर्वी या ठिकाणी हातगाडय़ा लावण्यात येत होत्या. मात्र आता फुटपाथवर स्टॉलची उभारणी करून व्यवसाय करण्यात येत आहे. व्यवसाय करण्यास विरोध नाही. मात्र पादचाऱयांसाठी निर्माण करण्यात आलेल्या 10 फूट रुंदीच्या संपूर्ण फुटपाथवर स्टॉल घालण्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर व्यावसायिक चढाओढीमध्ये काही फेरीवाल्यांनी सायकलट्रकवरही स्टॉल घातले आहेत. महापालिकेने याकडे दुर्लक्ष केल्यास स्टॉलधारक हळूहळू रस्त्यावर ठाण मांडण्याची शक्मयता असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.
नियमावली करून पादचाऱयांसाठी फुटपाथ मोकळे करणार का?
फुटपाथवर सर्रास ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाल्याने फुटपाथ पादचाऱयांसाठी की फेरीवाल्यांसाठी? असा मुद्दा उपस्थित होत आहे. वास्तविक पाहता वाहनांची संख्या वाढल्याने रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले होते. मात्र या रस्त्यावर मोठमोठे फुटपाथ करून वाहतुकीस अडथळा निर्माण करण्यात आला आहे. पादचाऱयांच्या नावाखाली निर्माण करण्यात आलेल्या फुटपाथचा वापर फेरीवालेच करीत आहेत. तसेच फुटपाथ आणि सायकल ट्रकमुळे रस्त्याशेजारी कोणतीही वाहने पार्क करता येत नाहीत. जर फळ खरेदीसाठी नागरिक वाहने पार्क करून थांबल्यास रस्त्यावर अडचण निर्माण होते. काहीवेळा वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत असते. त्यामुळे शहरातील फुटपाथबाबत नियमावली करून पादचाऱयांसाठी फुटपाथ मोकळे करणार का? अशी विचारणा होत आहे. मनपा व जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.









