बीफ मार्केटमधील गाळ्यांना चांगला प्रतिसाद
प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेच्यावतीने कसई गल्लीतील फिश मार्केट आणि बीफ मार्केटमधील गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव आयोजित केला होता. याप्रसंगी फिश मार्केटच्या गाळ्यांना बोली लागली नाही. मात्र बीफ मार्केटमधील व्यावसायिकांनीच लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊन बोली लावली. त्यामुळे बीफ मार्केटमधील गाळ्यांसाठी भाडेकरू मिळाले.
विविध ठिकाणी असलेल्या व्यापारी संकुलातील गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी यापूर्वी तीनवेळा लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र लिलाव प्रक्रियेत कोणीच सहभाग घेतला नसल्याने बोली लागली नव्हती. पण अलीकडेच 197 गाळ्यांसाठी महापालिकेने लिलाव प्रक्रिया आयोजित केली आहे. खंजर गल्ली, लक्ष्मी मार्केटसह बीफ मार्केटमधील गाळ्यांना बोली लावण्यात आली. मात्र फिश मार्केटमधील गाळ्यांसाठी प्रतिसाद लाभला नाही.
फिश मार्केट आणि बीफ मार्केटमधील गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी शुक्रवारी लिलाव प्रक्रिया आयोजित केली होती. पण यावेळी फिश मार्केटच्या लिलावात भाग घेण्यासाठी केवळ एकाच व्यक्तीने पैसे भरले होते. पण बोली लावण्यासाठी किमान चार व्यक्तींचा सहभाग आवश्यक आहे. मात्र कोणीच सहभाग घेतला नसल्याने फिश मार्केटच्या गाळ्यांना बोली लागली नाही. बीफ मार्केटमधील गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी आयोजित केलेल्या लिलावावेळी व्यावसायिकांनी सहभागी होऊन बोली लावली. मागील चार वर्षांपासून गाळ्यांचे भाडे भरले नव्हते. मात्र येथील व्यावसायिकांनी 1 लाख 93 हजार रुपये थकीत भाडे महापालिकेला जमा करून लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतला. सध्या व्यवसाय करीत असलेल्या व्यावसायिकांनी बोली लावली. त्यामुळे 10 गाळ्यांना भाडेकरू मिळाले आहेत.
या लिलाव प्रक्रियेवेळी महापालिकेचे महसूल उपायुक्त प्रशांत हनगंडी, महसूल निरीक्षक मल्लिकार्जुन गुंडप्पण्णावर, भरत तळवार, चंद्रू मुरारी, सुशांत कांबळे व इतर अधिकारी उपस्थित होते.









