किमान रक्कम ठेवण्याचे बंधन नाही
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱया प्रत्येक वाहनधारकाने फॉस्टगचा वापर सुरू केला असावा. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आता फास्टॅगसाठी मिनिमम बॅलेन्स (किमान रक्कम)चे बंधन हटविले आहे. पण ही सुविधा केवळ कार, जीप किंवा व्हॅनसाठीच आहे. वाणिज्यिक वाहनांना ही सुविधा मिळणार नाही.
फास्टॅग प्रदान करणाऱया बँका सुरक्षा अनामतच्या व्यतिरिक्त किमान रक्कम ठेवण्याची सक्ती करू शकत नाहीत. यापूर्वी बँका सुरक्षा अनामतसह किमान रक्कम ठेवण्याची सूचना करत होत्या. मिनिमम बॅलेन्समुळे अनेक फास्टॅग वापरकर्त्यांना स्वतःच्या खात्यात/वॉलेटमध्ये पुरेशी शिल्लक रक्कम असूनही टोलनाक्यावरून जाण्याची अनुमती मिळत नव्हती. यातूनच टोलनाक्यांवर अनावश्यक वाद निर्माण होत होते.
फास्टॅग खाते/वॉलेटमध्ये नकारात्मक शिल्लक नसेल तरच वाहनांना टोलनाक्यावरून जाऊ देण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे. फास्टॅग खात्यात कमी शिल्लक असेल तरीही कारला टोलनाका पार करण्याची अनुमती असते. टोलनाका ओलांडल्यावर फास्टॅग खाते नकारात्मक झाल्यास संबंधित ग्राहकाच्या सुरक्षा अनामतमधून बँका ही रक्कम वसूल करू शकतात.देशभरात सद्यकाळात 2.54 कोटींहून अधिक फास्टॅगचे वापरकर्ते आहेत. सध्या राष्ट्रीय महामार्गांवर एकूण टोलवसुलीत फास्टॅगचे योगदान 80 टक्के आहे.









