क्रीडा प्रतिनिधी / मडगाव

हिरो इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेत आज सोमवारी फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर ईस्ट बंगालचा सामना चेन्नईन एफसी संघाशी होईल. चेन्नईन एफसीचे 11 सामन्यांतून तीन विजय, पाच बरोबरी व तीन पराभवाने 14 तर ईस्ट बंगालचे दोन विजय, पाच बरोबरी आणि चार पराभवाने 11 गुण झाले आहेत.
चेन्नईनचे प्रशिक्षक क्साबा लॅस्झलो यांचा संघाच्या विजयांमध्ये भर घालण्याचा प्रयत्न असेल. गेल्या सात सामन्यांत चेन्नईनचा एकच पराभव झाला आहे. ही कामगिरी अगदी प्रभावी वाटत असली तरी दोन वेळच्या माजी विजेत्यांना गेल्या अकरा सामन्यांत पाच वेळा बरोबरी पत्करावी लागली आहे.
लॅस्झ्लो यांना संघ कामगिरी उंचावेल अशी आशा आहे. अनेक सामने आम्ही जिंकू शकलो असतो, पण आम्हाला बऱयाच वेळा बरोबरी साधावी लागली. स्पर्धेच्या दुसऱया टप्प्यात मात्र आम्ही जास्त भक्कम खेळ करू. संघ लढाऊ वृत्ती प्रदर्शित करेल आणि इतकेच नव्हे तर जास्त गोल करू शकतो आणि जिंकू शकतो हे सुद्धा दाखवून देईल, अशी आशा आहे असे लॅसझ्लो म्हणाले.
ईस्ट बंगालने ब्राईट इनोबाखरे हा नवा खेळाडू करारबद्ध केला असून कोलकाताच्या या संघाच्या कामगिरीवर त्याचा मोठा प्रभाव पडला आहे. पहिल्या टप्प्यात बहुतेक वेळा तळाशी राहिल्यानंतर आता या संघाने चांगलीच मुसंडी मारली आहे. चेन्नईन एफसीला या मोसमात अनेक दुखापतींना सामोरे जावे लागले आहे, पण लॅस्झलो आशावादी आणि सकारात्मक आहेत. आमच्याकडे प्रतिभा प्रदर्शित करण्याच्या प्रतिक्षेत असलेले खेळाडू आहेत आणि संघातील वातावरण तसेच समन्वय चांगला आहे, असे लॅस्झ्लो म्हणाले.
ईस्ट बंगालचा संघ मागील सहा सामन्यात अपराजित आहे. या घडीला रॉबी फाऊलर यांचा संघ बाद फेरीच्या स्थानापासून पाच गुणांवर आहे. अजून भरपूर गुणांसाठी खेळण्याची संधी आहे आणि आम्ही प्रयत्न करून तेवढे गुण मिळविण्यासाठी सक्रीय राहू, असे फाऊलर म्हणाले.
आपल्या संघाचे मनोधैर्य अगदी अप्रतिम आहे. आपला संघ कुठे असायला हवा आणि कुठे असला पाहिजे तेथे मजल मारण्यासाठी आम्ही छोटी पावले टाकत आहोत आम्हाला वाटचाल कायम ठेवावी लागेल आणि अपेक्षित कामगिरी साध्य करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवावे लागतील. येथून पुढे आम्ही सामने गमावणार नाही अशी आशा आहे व त्यासाठीचे आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे फाऊलर म्हणाले.









