संशयित आरोपी गुल्शन गुसाई याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश
प्रतिनिधी / मडगाव
आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना कोटय़ावधी रुपयांना गंडा घातल्याचा आरोप असलेल्या व सध्या कोठडीत असलेल्या आयसीआयसीआय बँकचा आर्लेम शाखेचा तत्कालीन शाखा व्यवस्थापक गुल्शन गुसाई याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा न्यायालयाने आदेश दिला आहे.
या संशयित आरोपीला जामिनावर सोडावे की नाही याचा न्यायालय आता 12 ऑगस्ट रोजी आपला निर्णय देण्याची शक्यता आहे. अटक केलेल्या या आरोपीला सोमवारी 10 ऑगस्ट रोजी न्यायालयापुढे उभे करण्यात आले तेव्हा न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
या आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर पोलिसांनी या आरोपीला अटक केली होती. त्यानंतर 24 तासाच्या आत त्याला न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने त्याला सुरुवातीला तीन दिवसपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता.
शुक्रवारी 7 ऑगस्ट रोजी या आरोपीला पुन्हा न्यायालयापुढे उभे करण्यात आले तेव्हा न्यायालयाने सोमवारपर्यंत संशयित आरोपी गुल्शन गुसाई याला पोलीस कोठडीत ठेवण्याचा पुन्हा आदेश दिला होता आणि आता न्यायालयाने दोन दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिलेला आहे.
पीडित साईनाथ पै काणे यांचे वकील मांगिरीश आंगले यांनी अशिलाच्यावतीने न्यायालयात युक्तिवाद करताना संशयित आरोपीला जामिनावर का सोडू नये या मागील अनेक कारणे सादर केली. संशयिताने आपल्याला जामिनावर सोडण्यात यावे यासाठी न्यायालयाकडे अर्ज केलेला असून त्यावर सोमवारी युक्तिवाद झाला. न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतला. 12 ऑगस्ट रोजी न्यायालय यावर आपला निर्णय देण्याची शक्यता आहे.









