भरदिवसा चोरटय़ांचे कृत्य
प्रतिनिधी/ फलटण
फलटण शहरातील डेक्कन चौकात उमाजी नाईक चौकाकडे जाणाऱया रोडलगत स्विफ्ट कार पार्क करण्यात आली होती. बंद स्विफ्ट कारची मागील डाव्या बाजुची काच फोडून सिटवर ठेवलेली सुमारे 2 लाख रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरटय़ाने लंपास केल्याची घटना फलटणमध्ये मंगळवारी भरदिवसा घडली आहे. अज्ञातावर पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा ग्न्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, फलटण शहरातील डेक्कन चौक येथील हॉटेल अशोका समोरील रोडलगत पार्क केलेल्या पांढऱया रंगाच्या स्विफ्ट कार (क्रमांक एम एच 11 सी डब्ल्यू 8148 ) या कारच्या मागील डाव्या बाजुची खिडकीची काच अज्ञात चोरटय़ानी फोडून मागील सिटवर ठेवलेली बॅग दोन लाख रुपयांच्या रोकडसह लंपास केली.
वेळोशी, ता. फलटण येथील अक्षय माने हे भारतीय सैन्यदलात कार्यरत आहेत त्यांच्या पत्नी व वडील यांच्यासह आपल्या चारचाकीत फ्लॅट खरेदीसाठी फलटणला आले होते. त्यांनी कर्ज प्रकरण प्रक्रिया करण्यासाठी येथील शिवकृपा पतसंस्थेतून दोन लाख रुपये काढले होते. यानंतर ते आपल्या गाडीत येवुन डेक्कन चौकात गाडी पार्क करून नाश्ता करण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेले. नाश्ता झाल्यानंतर गाडीजवळ येताच गाडीची काच फोडून पैसे असलेली बॅग गायब असल्याचे निदर्शनास आले. ही घटना दुपारी पावणे दोनच्या सुमारास घडली आहे.
अक्षय माने फ्लॅट खरेदी करण्याचे काम करून उद्या दिनांक 22 सप्टेंबर रोजी पुन्हा ते उत्तराखंड येथे सैन्य दलात जाण्यासाठी निघणार होते. त्यांचे वडीलही भारतीय सैन्य दलात कार्यरत होते व ते आत्ता सेवानिवृत्त आहेत. या घटनेमुळे त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.
दरम्यान, त्यांनी तात्काळ शहर पोलिस ठाण्यासी संपर्क केला पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, पोलिसांनी गाडी पार्क केलेल्या परिसरात असलेल्या सीसीटी0हीची पाहणी केली. त्यावरुन तेथून दुचाकीवरून जाणाऱया दोघांचा संशय असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक रावळ करीत आहेत.








