प्रतिनिधी/ फलटण
फलटण शहर व तालुक्याला देशी खेळांची जुनी परंपरा असून खो-खो, कबड्डी, हुतुतु या सारखे देशी खेळ येथे आवडीने खेळले जात त्या पार्श्वभूमीवर फलटणकरांनी यापूर्वी खो-खोच्या राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा, कबड्डीच्या राष्ट्रीय स्पर्धा, हॉकीच्या राज्यस्तरिय स्पर्धा अनेकवेळा यशस्वी केल्या असून आता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडयात येथील घडसोली मैदानावर आयोजित करण्यात येत असलेली 65 वी राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धा (14 वर्षाखालील मुले/मुली) निश्चित मोठय़ा उत्साही व आनंदी वातावरणात संपन्न होईल याची ग्वाही महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.
मुधोजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या ड्रॉईंग हॉलमध्ये दि. 1 ते 5 फेब्रुवारी दरम्यान घडसोली मैदान, फलटण येथे आयोजित करण्यात येत असलेल्या 65 व्या राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेच्या नियोजनाची माहिती व त्यामधील तृटी दूर करुन स्पर्धेसाठी झालेली सिध्दता तपासून घेण्यासाठी आयोजित बैठकीत अध्यक्षस्थानावरुन श्रीमंत संजीवराजे बोलत होते. यावेळी असोसिएशनचे जिल्हा सचिव महेंद्र गाढवे, सदस्य ऍड. रमेशचंद्र भोसले, जिल्हा क्रिडाधिकारी युवराज नाईक, नायब तहसीलदार अनिल ठोंबरे, पोलीस उपनिरिक्षक दळवी व नागटिळक, प्रभारी तालुका क्रिडाधिकारी खंडाळा महेश खुटाळे, प्रभारी तालुका क्रिडाधिकारी फलटण अनिल सातव, फलटण एज्युकेशन सोसायटी क्रिडा समिती चेअरमन शिवाजीराव घोरपडे, सोसायटीचे प्रशासनाधिकारी प्राचार्य अरविंद निकम, मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य खुरंगे, निवृत्त प्राचार्य ए.के.रुपनवर, खो-खो चे राष्ट्रीय खेळाडू दादासाहेब चोरमले, नजिरभाई शेख, अमोल उर्फ आबा पवार, डॉ. सुभाष गायकवाड, केमिस्ट ऍण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष राहुल मोहिते, संजय शहा यांच्यासह फलटण एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळ सदस्य आणि सोसायटीच्या विविध शाळा, महाविद्यालयातील क्रिडा शिक्षक उपस्थित होते.
जिल्हा क्रिडाधिकारी युवराज नाईक यांनी प्रारंभी खो-खोच्या राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये मोठय़ा उत्साहाने सहभागी होवून त्या यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिलेले स्व. पी.जी.शिंदे सर यांची आठवण यानिमित्ताने आल्याशिवाय राहत नाही असे सांगून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात फलटण येथे होत असलेल्या या राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धा या अगोदर अमरावती येथे घेण्याचे निश्चित झाले होते. तथापी त्यानंतर या राष्ट्रीय स्पर्धा फलटण येथे घेणेच उचित होणार असल्याचे स्पष्ट झाल्याने सदरचा निर्णय बदलून या स्पर्धा आता फलटण येथे दि. 1 ते 5 फेब्रुवारी दरम्यान घेण्याचे निश्चित करण्यात आल्याने फलटणकरांना स्पर्धेच्या नियोजनासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही परंतू तरीही फलटणकरांची खेळाविषयी असलेली आपुलकी व प्रेम लक्षात घेवून ही जबाबदारी सोपविण्यात आली असून सर्वांच्या सहकार्याने फलटणकर या स्पर्धा यशस्वी करतील याची आपल्याला खात्री असल्याचे जिल्हा क्रिडाधिकारी युवराज नाईक यांनी प्रारंभीच स्पष्ट केले.
65 व्या राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेमध्ये देशभरातून 30 मुलांचे व 30 मुलींचे असे एकुण 60 संघ म्हणजे सुमोर 900 ते 1000 खेळाडू, क्रिडा मार्गदर्शक, काही खेळाडूंचे पालक आणि खो-खो प्रेमी नागरिक या स्पर्धांच्या निमित्ताने फलटण शहरात 5 दिवस वास्तव्यास राहणार असल्याने त्यांच्या निवास, भोजन आणि निवासस्थानापासून घडसोली मैदानापर्यंतच्या प्रवास (वाहतूक) व्यवस्थेची जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडावी लागणार आहे. त्याचबरोबर घडसोली मैदानावर सरावासाठी 2 आणि स्पर्धेसाठी 4 अशी 6 मैदाने तयार करावी लागणार असून सुमारे 4 ते 5 हजार प्रेक्षक बसू शकतील अशी प्रेक्षक गॅलरी, व्यासपीठ उभारावे लागणार असून खेळाचे मैदान आणि खेळाडूंच्या निवासाचे ठिकाणी सुरक्षिततेची व्यवस्था करावी लागणार असल्याचे जिल्हा क्रिडाधिकारी नाईक यांनी स्पष्ट केले.
श्रीमंत संजीवराजे यांनी या स्पर्धांचे नियोजन व संपूर्ण व्यवस्थेसाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असून त्यामध्ये प्रामुख्याने क्रिडांगण, स्टेज, निवास, भोजन, रेकॉर्ड, वाहतूक, प्रसिध्दी समित्या गठीत करण्यात आल्या असून या समित्यांचे कामकाज सुरु झाले आहे. एवढय़ा मोठय़ा संख्येने देशाच्या विविध भागातून येणारे खेळाडूंची उत्तम भोजन व निवास व्यवस्था तसेच निवासाच्या ठिकाणी खेळाडूंची सुरक्षितता याला प्राधान्य देण्यात आले आहे. त्याप्रमाणे संपूर्ण नियोजन करण्यात येत असल्याचे स्पष्ट करतानाच मैदानावरही उत्तम प्रकारची मैदाने, प्रेक्षक गॅलरी आणि स्टेज व्यवस्था करण्यात येत असल्याचे श्रीमंत संजीवराजे यांनी स्पष्ट केले.
प्रारंभी सुजित जमदाडे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रभारी तालुका क्रिडाधिकारी महेश खुटाळे व त्यांच्या सहकार्यांनी तसेच फलटण एज्युकेशन सोसायटी क्रिडा समिती व अन्य पदाधिकारी, अधिकार्यांनी केलेल्या नियोजनाविषयी सविस्तर माहिती देवून आगामी काळात उर्वरित कामे पूर्ण करुन 65 व्या राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धा यशस्वी करण्याची ग्वाही सर्वांनी एकमुखाने दिल्यानंतर श्रीमंत संजीवराजे यांनी समाधान व्यक्त केले.









