प्रतिनिधी / फलटण :
फलटण शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मोती चौकातील रेव्हेन्यू क्लब इमारत परिसर तळीरामांचा अड्डा बनला असून, या परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या इमारतीची दुरावस्था झाली आहे. याकडे महसूल विभागाने पूर्णपणे डोळेझाक केली असल्याचे या वास्तुकडे पाहिल्यानंतर दिसून येते.
महाराष्ट्रात महसूली विभागातील तलाठी व मंडल अधिकारी यांना तालुक्याच्या ठिकाणी आपले कामकाज करण्यासाठी एक इमारत असावी, या उद्देशाने तालुक्याच्या ठिकाणी रेव्हेन्यू क्लबच्या इमारती उभारण्यात आल्या होत्या. संबंधित अधिकारी गावचे कामकाज आटपून तालुक्याच्या ठिकाणी आल्यावर त्यांना बसण्यासाठी आणि तालुक्याच्या ठिकाणी एकाच जागेवर लोकांना हवी असलेली कागदपत्रे मिळाविणे हाच मुख्य उद्देश या क्लबचा होता.
फलटण शहरातील मोती चौकात असलेल्या रेव्हेन्यू क्लबच्या इमारतीचा उदघाटन समारंभ 1969 साली तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते करण्यात आला होता. आज या इमारतीस 52 वर्ष झाली आहेत. या इमारतीची महसूल विभागाने देखभाल दुरुस्ती न ठेवल्याने आज या इमारतीची दुरावस्था झाली आहे.
क्लबच्या इमारत परिसरात मोठ्या प्रमाणात दारुच्या बाटल्या पडलेल्या असून, हा परिसर तळीरामांचा अड्डा झाला आहे. या इमारतीच्या परिसरात सायंकाळी अंधार पडल्यावर तळीरामांची बैठक होते, असे या परिसरातील नागरिक सांगतात. या ठिकाणी त्यांना महसूलचे अधिकारी विरोध करत नाहीत अथवा पोलीसात तक्रार देखील देत नाहीत.
इमारतीच्या दुरावस्थेबाबत फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप व तहसीलदार समीर यादव यांना विचारले असता या इमारतीचा प्रस्ताव तयार केला असून, तो वरिष्ठांना कोरोनामुळे पाठवला नसल्याचे सांगण्यात आले.









