अभयकुमार करडी स्मृती क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
आनंद क्रिकेट अकादमी आयोजित अभयकुमार करडी स्मृती चषक 14 वर्षाखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात फर्स्ट क्रिकेट अकादमी संघाने आनंद क्रिकेट अकादमी ब संघाचा 216 धावांनी पराभव केला. शतकवीर सुजय कोरवार याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
भुतरामहट्टी येथील भगवान महावीर स्कुलच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या या सामन्यात फर्स्ट क्रिकेट अकादमी संघाने 37 षटकात 7 बाद 333 धावा केल्या. सुजय कोरवारने 3 षटकार व 17 चौकारांच्या मदतीने 93 चेंडूत 148 धावा करून शतक झळकविले. त्याला श्रेयांशु ए. एन.ने 49 धावा करून सुरेख साथ दिली. आनंद अकादमीतर्फे सुमेजने 50 धावात 3, अथर्व करडीने 39 धावात 2 तर श्लोक व आयन मुल्ला यानी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना आनंद क्रिकेट अकादमी ब संघाचा डाव 19.1 षटकात 117 धावात आटोपला. आदित्य भंडारीने 5 चौकारासह 21 तर हैदरअली सय्यद व अथर्व करडी यांनी प्रत्येकी 17 धावा केल्या. फर्स्ट क्रिकेट अकादमीतर्फे श्रेयांशु ए. एन.ने 29 धावात 3, प्रज्वल बी.ने 6 धावात 2, अभिषेक करगुप्पीने 4 धावात 2 गडी बाद केले.









