होल्गर, मेदवेदेव्ह, रूड, जॉर्जी, कीज चौथ्या फेरीत, साबालेन्का स्पर्धेबाहेर
वृत्तसंस्था/ पॅरिस
डेन्मार्कचा 19 वर्षीय होल्गर रुनेने स्थानिक खेळाडू हय़ुगो गॅस्टनचा पराभव करून प्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत प्रवेश मिळविला. याशिवाय कॅस्पर रूड, व्हेरोनिका कुडरमेटोव्हा, मॅडिसन कीज, कॅमिला जॉर्जी, दारिया कॅसात्किना, मेदवेदेव्ह यांनीही चौथी फेरी गाठली तर लैला फर्नांडेझ व इटलीची मार्टिना ट्रेव्हिसन यांनी उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. सातव्या मानांकित आर्यना साबालेन्का, अमांदा ऍनिसिमोव्हा यांचे आव्हान संपुष्टात आले तर पॉला बेडोसाला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली.
महिला एकेरीत अमेरिकन ओपनची अंतिम फेरी गाठलेल्या कॅनडाच्या लैला फर्नांडेझने बेसलाईन खेळाच्या जुगलबंदीत अमेरिकेच्या 27 व्या मानांकित अमांदा ऍनिसिमोव्हाचा 6-3, 4-6, 6-3 असा पराभव करून पहिल्यांदाच शेवटच्या आठमधील स्थान निश्चित केले. तिची पुढील लढत मार्टिना टेव्हिसनशी होईल. टेव्हिसनने 47 व्या मानांकित बेलारुसच्या ऍलियाक्सांड्रा सॅसनोविचचा 7-6 (12-10), 7-5 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.
रशियाच्या कुडरमेटोव्हाला बेडोसाकडून पुढे चाल मिळाल्याने चौथ्या फेरीत स्थान मिळाले. कुडरमेटोव्होने 6-3, 2-1 अशी आघाडी मिळविली असताना स्पेनच्या बेडोसाने दुखापतीमुळे माघार घेतली. तिची पुढील लढत मॅडिसन कीजशी होईल. कीजने 16 व्या मानांकित एलेना रिबाकिनाचा 3-6, 6-1, 7-6 (7-3) असा पराभव केला. त्याआधी कॅमिला जॉर्जीने साबालेन्काला 6-3, 6-2 असा पराभवाचा धक्का देत स्पर्धेबाहेर घालविले. तिची पुढील लढत कॅसात्किनाशी होईल. कॅसात्किनाने शेल्बी रॉजर्सचा 6-3, 6-2 असा धुव्वा उडवित चौथी फेरी गाठली. मात्र लिओलिया जीनजीनची विजयी घोडदौड तिसऱया फेरीत संपुष्टात आली. इरिना कॅमेलिया बेगूने तिला 6-1, 6-4 असे नमविले.
पुरुष एकेरीत डेन्मार्कच्या होल्गर रुनेने हय़ुगो गॅस्टनचा 6-3, 6-3, 6-3 असा पराभव करून चौथी फेरी गाठली. रुनेने प्रेंच स्पर्धेत कनिष्ठ गटात तीन वर्षापूर्वी एकेरीचे जेतेपद मिळविले होते. त्याची पुढील लढत सित्सिपसशी होईल. आठव्या मानांकित कॅस्पर रूडने इटलीच्या लॉरेन्झो सोनेगोवर पाच सेट्सच्या झुंजीत 6-2, 6-7 (3-7), 1-6, 6-4, 6-3 अशी संघर्षपूर्ण मात केली. त्याची लढत 12 व्या मानांकित हय़ुबर्ट हुरकाझशी होईल.
अन्य एका सामन्यात द्वितीय मानांकित मेदवेदेव्हने 28 व्या मानांकित सर्बियाच्या मिओमिर केसमानोविकचा 6-2, 6-4, 6-2 असा पराभव करीत चौथी फेरी गाठली. सलग चार प्रेंच ओपन स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभूत झाल्यानंतर मेदवेदेव्हने गेल्या वर्षी उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. गिलेस सिमोन किंवा मारिन सिलिक यापैकी एकाशी त्याची पुढील लढत होईल.









