14 वर्षांपासून होता फरारी – शहर पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी/ सातारा
हाफ मर्डरच्या केसमध्ये न्यायालयीन कामकाजासाठी हजर न राहता 14 वर्षांपासून फरारी असणाऱया आरोपीला अटक करण्यात सातारा शहर पोलीस ठाणे व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले आहे. ज्या आरोपींवर गुन्हे दाखल आहेत त्यांनी न्यायालयाच्या कामकाजाच्या तारखेला हजर रहावे, अन्यथा कारागृहामध्ये जावे लागेल, असा इशारा पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वसंत निवृत्ती सूर्यवंशी, (वय 52, रा. हेळगाव, ता. कराड) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात हाफ मर्डरचा गुन्हा दाखल झाला होता. त्याला अटक करून नंतर त्यांची सुटका करण्यात आल्यानंतर तो 14 वर्षापासून न्यायालयातील कामकाजासाठी हजर न राहत फरार झाला होता. त्यामुळे त्याच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात आले होते. तरीदेखील तो सापडत नसल्याने न्यायालयाने त्याच्या मालमत्ता जप्तीचे आदेश दिले होते.
सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक यांनी त्याचा युद्धपातळीवर शोध घेण्याचा प्रयत्न केला.वसंत निवृत्ती सूर्यवंशी याची माहिती प्राप्त करून दि. 11 नोव्हेंबर रोजी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली. या कारवाईत सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर कदम, सहाय्यक फौजदार अविनाश पवार, संजय दिघे, पोलीस नाईक सुजित भोसले, पोलीस कॉन्टेबल सागर गायकवाड विक्रम माने यांनी सहभाग घेतला.








