ऑनलाईन टीम / नाशिक :
शिक्षण संस्थेच्या सरकारी अनुदानला मंजुरी देण्यासाठी 8 लाख रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडल्या गेलेल्या नाशिकच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर अखेर पोलिसांच्या जाळय़ात सापडल्यात. एसीबीने त्यांना अटक केली आहे. त्यामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. विशेष म्हणजे आजच त्यांनी वकिलामार्फत अटकपूर्व जामिनासाठीही अर्ज केला होता.
सरकारने मंजूर केलेल्या दोन शिक्षण संस्थांशी संबंधित शाळांमध्ये 20 अनुदानानुसार नियमत वेतन सुरू करण्याचा कार्यादेश काढण्यासाठी वैशाली झनकर यांनी 9 लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती आठ लाख रुपये देण्याचे ठरले होते. दरम्यान तक्रारदाराने ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून शासकीय वाहन चालक ज्ञानेश्वर सूर्यकांत येवले यांच्यामार्फत ही लाच त्र्यंबकनाका परिसरात स्वीकारत असतांनाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चालक येवलेला रंगेहाथ पकडले. ठाणे लाचलुचपत विभागाने केलेली ही कारवाई केली होती.
चौकशीनंतर शिक्षणधिकारी झनकर घरी परतल्या होत्या. सकाळी साडेआठ वाजता न्यायालयात हजर होण्याचे आदेश एसीबीने त्यांना दिले होते. मात्र, हे आदेश धुडकावून वैशाली झनकर-वीर गैरहजर राहिल्या आहेत. आणि त्यानंतर त्या फरार होत्या. त्यांनी आपली रवानगी तुरुंगात होऊ नये म्हणून प्रयत्न करण्यास सुरुवात केली होती. मात्र, अखेर त्याना आज अटक करण्यात आली आहे. आज त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे.
दरम्यान, लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्याकडे कोटय़ावधींची ‘माया’ असल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे शासनाने देखील शिक्षण आयुक्तांना वैशाली झनकर यांच्या निलंबनाचे आदेश दिलेत. त्यामुळे आता शिक्षण आयुक्त काय भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.








