प्रतिनिधी /पणजी
भारतीय जनता पक्षाच्या आमदारांसाठी सायंकाळी उशिरा घेण्यात आलेल्या खास बैठकीत काही आमदार भावनिक झाले. राज्याचे उपसभापती इजिदोर फर्नांडिस हे अती भावनिक झाले आणि काँग्रेसमधून फुटून आलेल्या दहाही आमदारांबाबत पक्ष उमेदवारीबाबत मात्र शाश्वती देत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे, असे निवेदन केले.
पक्षाचे गोव्याचे प्रभारी म्हणून नियुक्त केलेले देवेंद्र फडणवीस यांनी काल सोमवारी मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या आमदारांची एक विशेष बैठक येथील हॉटेल विवांताच्या सभागृहात घेतली. बैठकीत भाजपचे सर्व उमेदवार उपस्थित होते. अनेक मंत्री व आमदारांनी यावेळी आपापले विचार मांडले. त्यातून प्रेरणा घेऊन उपसभापती इजिदोर फर्नांडिस हे अचानक आक्रमकही झाले आणि ते भावनात्मकदृष्टय़ा बोलू लागले.
बैठकीत काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये आलेल्या दहाही आमदारांना त्यांनी उभे राहण्यास सांगितले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अंगुलीनिर्देश करून इजिदोर म्हणाले की, हे पहा हे सर्वजण काँग्रेसचा त्याग करून भाजपमध्ये आले आणि हे भाजपमध्ये आले नसते तर राज्यात भाजपचे सरकार राहिले नसते. आम्ही सर्व लोकांनी केलेल्या त्यागाची आठवण पक्षाने ठेवली पाहिजे. पक्षांतर करतेवेळी आम्हाला उमेदवारी देऊ, असे सांगितले होते. मात्र आज प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्हा सर्वांना येथील माजी मंत्री वा माजी आमदार हे आपल्याला पाहिजे तसे निवेदने करतात, आमच्यावरती जोरदार जाहीर टीका करतात आणि वरुन आपल्याला उमेदवारी मिळणार, असे स्वयंघोषित करतात. अशावेळी पक्षाने त्यांना रोखणे आवश्यक आहे. उलटपक्षी पक्षातील काही मंडळी त्यांचे समर्थन करतात, याचेच आम्हाला सखेदाश्चर्य वाटते. या प्रकारामुळे व इजिदोर फर्नांडिस यांच्या निवेदनामुळे सारे अवाक होवून पाहतच राहिले.









