ऑनलाईन टीम / मुंबई :
फोन टॅपिंग आणि मुंबई पोलिसांच्या बदली घोटाळ्याप्रकरणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बीकेसी पोलिसांनी नोटीस बजावली होती. त्यानुसार फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. पोलीस आयुक्त नितीन जाधव, उपायुक्त हेमराजसिंग राजपूत यांच्यासह तीन पोलीस अधिकारी फडणवीस यांची चौकशी करत आहेत. फडणवीस यांच्या बंगल्याबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सागर बंगल्याबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनीही गर्दी केली असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार नितेश राणे हे देखील सागर बंगल्यावर उपस्थित आहेत. दरम्यान, फडणवीसांना आलेल्या नोटिशीविरोधात भाजप आक्रमक झाले आहे. आज राज्यभर मुंबई पोलिसांच्या नोटिशीची होळी भाजपतर्फे करण्यात येत आहे. महाविकास आघाडीविरोधात भाजपकडून जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. मुंबईत राम कदम यांच्या नेतृत्त्वात भाजपनं आंदोलन केलं. तर पुण्यातही महापालिकेसमोर भाजपनं आंदोलन करण्यात आलं. नागपुरातही फडणवीसांच्या समर्थनात आंदोलन झालं. या आंदोलनात भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडेही सहभागी झाले होते.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात आपल्याकडे आणखी पुरावे असून सीबीआयकडे तपास दिला तर त्यांच्याकडे पुरावे देऊ असं फडणवीसांनी म्हटलं आहे.









