ऑनलाईन टीम / धुळे :
मागील पाच वर्षात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने हजारो कोटींचे घोटाळे केले आहेत. ते आजवरचे सर्वात भ्रष्ट सरकार होते. पाच वर्ष त्यांनी राज्याला ओरबाडून काढल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी केला आहे. तसेच धुळे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला दोन अंकी जागा मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. गोटे म्हणाले, 2014 मध्ये फडणवीस सरकारने केवळ आश्वासनांची खैरात केली. त्यामुळे लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास उडाला आहे. विविध विकासकामांचा उल्लेख करत शिवस्मारक, समृद्धी महामार्ग या कामात फडणवीस सरकारने मोठा घोटाळा केला आहे. त्याची सर्व माहिती माझ्याकडे आहे, असे गोटे म्हणाले.









