प्रतिनिधी / कोल्हापूर
‘मी पुन्हा येईल, आषाढी एकादशीला पांडूरंगाची पूजा करेल’ असे तत्कालिन मुख्यमंत्री, सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी जाहीरपणे सांगितले होते. पण फडणवीस पुन्हा सत्तेत यावेत हे पांडुरंगालाच मान्य नव्हते. नियतीला देखील ते पटले नाही. म्हणूनच राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पांडुरंगाची पुजा केली. त्यामुळे फडणवीस यांच्यासह भाजपने सत्ता स्थापनेची स्वप्ने पाहू नयेत असा टोला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी फडणवीस यांना लगावला.
15 व्या वित्त आयोगातून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांना प्रत्येकी 10 टक्के निधीची तरतूद केल्याबद्दल जि.प. व पं.स.पदाधिकाऱयांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा शासकीय विश्रामगृहामध्ये सत्कार केला. यावेळी ते बोलत होते.
मुश्रीफ म्हणाले, सहा महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर झाले. निवडणुकीनंतर भाजपचे संख्याबळ पाहता आम्ही सत्तेच्या सोपानापर्यंत पोहचू असे वाटले नव्हते. पण सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी महाविकास आघाडीचे सरकार यावे हे नियतीच्या मनात होते. जानेवारी, फेब्रुवारी हा दोन महिन्यांचा कालावधी वगळता शंभर दिवसांहून अधिक कालावधी लॉकडाऊनमध्ये गेला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयामध्ये मर्यादित अधिकारी व कर्मचारी संख्या ठेवली आहे. पण ग्रामविकासमंत्री या नात्याने प्रत्येक आठवडय़ात मंत्रालयात जाऊन जनहिताचे काम करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.