बेंगळूर /प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. बुधवारी राज्यात तीन हजाराहून अधिक रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढत चालली आहे. त्यामुळे राज्यातील वाढती कोरोना संख्या लक्षात घेता सरकारने कोरोनमुक्त झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी त्यांना प्रोत्साहन म्हणून ५ हजार रुपयर दिले जाणार आहेत. वैद्यकीय शिक्षणमंत्री सुधाकर यांनी प्लाझ्मा देणार्यांना सरकारकडून पाच हजार रुपये दिले जातील असे जाहीर केले आहे.

सरकारने जारी केलेल्या आदेशात “प्लाझ्मा दान करणारा व्यक्ती कोरोनातून १४ ते २८ दिवसात बारा झालेला असावा आणि प्लाझ्मा रक्तदात्यांना केवळ एकदाच प्रोत्साहनपर म्हणून ५ हजार दिले जातील” असे म्हंटले आहे.. कर्नाटकचे वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी बुधवारी , “आम्ही प्लाझ्मा देणाऱ्यास ५ हजार रुपये प्रोत्साहन म्हणून देण्याचे ठरविले आहे. कृपया स्वेच्छेने पुढे या आणि प्लाझ्मा दान करून रुग्णांना बरे होण्यास मदत करा ” असे आवाहन केले आहे.
मंत्री सुधाकर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात कोरोनाबाधित रुग्णांपैकी आतापर्यंत ५ रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी करण्यात आली आहे. त्यापैकी तीन रुग्ण बरे झाले आहेत. इतर दोन रुग्णांचा या आजाराने बळी घेतला आहे.









