दोन्ही पोलिस दोनापावला आऊट पोस्टवरील
प्रतिनिधी /पणजी
दोनापावला समुद्रकिनाऱयावर सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत बसलेल्या एका प्रेमी युगुलाला धमकावून त्यांच्याकडून 10 हजार रुपये उकळल्याप्रकरणी दोनापावला आऊट पोस्टच्या दोन पोलिसांना निलंबीत करण्यात आले आहे. मात्र खाकी वेषातील या लुटारुंवर कारवाई करूनही त्यांची नावे जाहीर करण्याचे सौजन्य न दाखविता उलट त्यासाठी संबधीत पोलीस अधिकारी रात्री उशिरापर्यंत टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरु आहे की काय, असा संशय व्यक्त केला जात आहे.
ज्या प्रेमी युगुलाला पोलिसांनी लुटले, त्यातील प्रियकराने मोठय़ा सावधगीरीने हे प्रकरण हाताळून पोलीस अधिकाऱयांकडे तक्रार दाखल केली. दोनापावला येथील पोलिस आऊट पोस्टवर काम करणाऱया त्या दोन पोलिसांच्या विरोधात काल मंगळवारी चौकशी करून त्यांना निलंबीत करण्यात आले आहे. या प्रकरणात राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप होऊ लागल्यानंतर निलंबीत केलेल्या संशयितांची नावे जाहीर करणे पोलिस अधिकारी टाळत असल्याचे दिसून येत आहे.
क्ढारवाई नको असेल तर, दहा हजार द्या
प्राप्त माहितीनुसार सोमवारी संध्याकाळी उशिरापर्यंत दोनापावला येथील समुद्रकिनाऱयावर हे प्रेमी युगुल बसले होते. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्यांना दमदाटी केली आणि कारवाई करण्याची धमकी दिली. कारवाई नको असल्यास दहा हजार रुपये द्या, अशी मागणी केली. त्या प्रियकराकडे दहा हजार रुपये नव्हते. दहा हजार रुपयांची आत्ताच व्यवस्था कर, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागणार, असे धमकावण्यात आले. शेवटी विनाकारण कटकट नको म्हणून प्रियकराने एटीएममधून दहा हजार रुपये काढले आणि त्या पोलिसांना दिले.
प्रियकर ठरला शेरास सव्वाशेर
प्रकरण मिटले आणि आपल्याला दहा हजार मिळाले, म्हणून पोलिस रात्री तेथून गेले. मात्र शेरास सव्वाशेर असलेल्या त्या प्रियकराने मंगळवारी दोन्ही पोलिसांविरोधात वरिष्ठ पोलिस अधिकाऱयांकडे तक्रार केली. एवढेच नव्हे तर, भक्कम पुरावेही दिले. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेऊन चौकशीचा आदेश दिला. चौकशीत तथ्य आढळून आल्याने दोन्ही पोलिसांच्या या कृत्त्यावर शेरा मारून तक्रार उत्तर गोवा पोलीस अधीक्षकांकडे पाठविण्यात आली.
दोन्ही पोलिसांचे धाबे दणाणल
या दोन्ही पोलिसांच्या विरोधातील तक्रार पणजी पोलीस स्थानकातून उप विभागीय पोलीस अधिकाऱयांकडे (एसडीपीओ) पोचली आहे. एसडीपीओ कार्यालयातून हे प्रकरण उत्तर गोवा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात पोचले आणि त्यांची चौकशी सुरु झाल्यानंतर दोन्ही पोलिसांचे धाबे दणाणले.
रात्री उशिरा प्रकरण दडपण्याचे प्रयत्न
निलंबित करण्यात आल्यानंतर दोन्ही पोलिसांनी राजकीय नेत्याचे पाय धरणे सुरु केले आहे, त्यामुळे निलंबीत करण्यात आलेल्या या पोलिसांची नावे उघड करण्यात आलेली नाही. एकंदरीत हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे पोलिस सूत्रांकडून समजले. संबंधित अधिकाऱयांकडे संपर्क साधला असता, आपण कामात व्यस्त असल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार निलंबीतांपैकी एक पोलीस साळ-डिचोली येथील आहे.









