बाजार तेजीसोबत बंद : निफ्टी 70.90 अंकांनी तेजीत
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ात प्रामुख्याने शेअर बाजारात तेजी आणि घसरणीचा प्रवास राहिलेला आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये काही प्रमाणात अस्थिरतेचे वातावरण राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. शुक्रवारी आवठवडय़ातील शेवटच्या दिवशी सुरुवातीपासूनच शेअर बाजारात सर्वाधिक घसरणीचे सत्र सुरु झाले होते. यामुळे काही प्रमाणात बाजारात निराशाजनक वातारण राहिले होते. परंतु बाजाराने आपली तेजी परत मिळवत दिवसअखेर सेन्सेक्स आणि निफ्टी झेपावत बंद झाले आहेत.
दिवसभरात रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग सर्वाधिक तेजीत राहिले होते आणि युरोपियन बाजारांमधील कामगिरीचा प्रभाव देशातील शेअर बाजारांवर पडल्याने गमावलेली तेजी परत मिळवत शेअर बाजार बंद झाले आहेत. दिवसअखेर सेन्सेक्स 242.52 अंकांनी वधारुन निर्देशांक 33,780.89 वर बंद झाला. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी 70.90 अंकांनी वधारुन निर्देशांक 9,972.90 वर बंद झाला. सकाळच्या सत्रात सेन्सेक्सने 1,190.27 अंकांची घसरण नोंदवत निर्देशांक 32,348.10 ची पातळी गाठली होती.
दिग्गज कंपन्यांमध्ये प्रामुख्याने महिंद्रा ऍण्ड महिंद्रा सात टक्क्मयांनी तेजीत राहिली आहे तर अन्य कंपन्यांमध्ये बजाज फायनान्स, हिरो मोटो, रिलायन्स इंडस्ट्रीज, टायटन आणि बजाज ऑटो यांचे समभाग मात्र नफ्यात राहिले होते. दुसऱया बाजूला मात्र ओएनजीसी, टेक महिंद्रा, पॉवरग्रिड कॉर्प, इन्फोसिस आणि कोटक बँक यांचे समभाग मात्र घसरणीत राहिले आहेत.
सुरुवातीच्या व्यवहारादरम्यान वॉल स्ट्रीट आणि आशियाई बाजारातील नकारात्मक संकेतामुळे, विदेशी कोषांच्या बाहेर जाणे आणि कोविडचे वाढते रुग्ण या सर्वाच्या प्रभावामुळे प्रारंभीच्या काळात शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती असे विश्लेषकांनी म्हटले आहे. दुपारनंतर मात्र रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मजबूत कामगिरीने आणि युरोपिय समभागांच्या ताकदीवर देशातील गुंतवणूकादारांच्या सकारात्मकतेमुळे सेन्सेक्सने झेप घेतली असल्याचे पहावयास मिळाले आहे.








