तीन दिवसांनंतर सरकारकडे प्रस्ताव मांडणार
प्रतिनिधी / पणजी
खाजगी प्रवासी बसगाडय़ा सरकार भाडेपट्टीवर घेण्यास तयार असल्याने काल मंगळवारपासून तीन दिवसांसाठी प्रायोगिक तत्वावर खाजगी बसगाडय़ा सुरु झाल्या आहेत. प्रत्येक मार्गावरील केवळ एक ते दोन बसगाडय़ा सुरु करण्यात आल्या आहेत. खाजगी बसगाडय़ांना प्रवासी कसे काय मिळतात, तसेच मिळालेल्या प्रवाशातून व सरकारने घालून दिलेल्या नियमांतून बसमालकाच्या खर्चाचा ताळमेळ बतसो काय, याची पाहाणी करून तीन दिवसानंतर सरकारकडे पॅकेजबाबत प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.
सरकारकडून आमच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यानंतर पुढे काय करायचे याचा विचार करू असे खाजगी बसमालक संघटनेचे अध्यक्ष सुदेश कळंगुटकर यांनी सांगितले.
संपूर्ण राज्यात सुमारे 1400 खाजगी बसगाडय़ा चालतात. बसमालकांच्या दोन संघटना असून एक संघटना सुदेश कळंगुटकर यांच्या अध्यक्षतेखाली चालत आहे. दुसरी संघटना सुदीप ताम्हणकर यांच्या अध्यक्षतेखाली चालत आहे. लॉकडाऊनच्या काळातही खाजगी बसगाडय़ा चालवायच्या असल्यास सरकारकडून मदत मिळायला हवी या मुद्दयावर दोन्ही संघटना एकत्र आल्या आहेत. दोन्ही संघटनांच्या अध्यक्षांनी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांची भेट घेतली आहे. तसेच वीजमंत्री नीलेश काब्राल यांचीही भेट घेतल्यानंतर काल मंगळवारपासून प्रायोगित तत्वावर खाजगी बसगाडय़ा सुरु करण्यात आल्या आहेत.
बसगाडय़ा सुरु करणे परवडणारे नाही
सरकारने घालून दिलेले नियम पाळून सध्या खाजगी बसगाडय़ा सुरु करणे बसमालकांना परवडणारे नाही. सरकारने यथायोग्य आर्थिक सहकार्य करावे. सरकार कदंब महामंडळाला मोठे सहकार्य करीत आहे मात्र खाजगी बसमालकाना प्रत्येकवेळी टाळत आहे. कंदब बसला पास योजना सुरु केल्यानंतर खाजगी बसमालकांना इंधन अनुदान देण्यात येईल, असे जाहीर केले होते. मात्र 2017 पासून अद्याप इंधन अनुदान मिळालेले नाही. सध्या स्थितीत बसगाडय़ा सुरु केल्यास बसमालकांचे काय होणार असा प्रश्न सुदेश कळंगुटकर यांनी उपस्थित केला आहे.
सरकारने खाजगी बसगाडय़ा चालवायला घ्याल्यात
सरकारने खाजगी बसगाडय़ा चालवायला घ्याव्यात. प्रत्येक बसवर सरकारने वाहक नियुक्त करावा. चालक, इंधन व वाहकाचा खर्च सरकारने करावा. दिवसाला 150 कि. मी. बस चालत असेल तर त्या मालकाला प्रतीदिन 2000 रुपये प्रमाणे मदत करावी. त्यात बसची देखरेख, इन्शुरन्स, महिन्याचा बँकेचा हप्त व इतर खर्च वजा करुन जे काय राहिल ते पैसे म्हणजे बसमालकाचा फायदा असेल, असेही कळंगुटकर यांनी सांगितले.
खाजगी बसगाडय़ांचा जो अंदाधुंद कारभार सुरु होता त्याच्यावरही आळा बसणार तसेच प्रवाशांनाही चांगली सेवा मिळणार आहे. लॉकडाऊनच्या काळात प्रत्येक दिवशी बस सॅनिटाईझ करणे हे बसमालकाचे काम असेल. हा प्रकार कोरोनाचे संकट संपेपर्यंत सुरु ठेवावा. गेल्या कित्येक दिवसांपासून बसगाडय़ा जागेवर असल्याने त्या पूर्ववत सुरु करण्यासाठी मोठा खटाटोप करावा लागेल. त्या अशाच पुढेही बंद राहिल्या तर बसगाडय़ा भंगारात काढण्याची पाळी येईल. मग बसमालकाने काय करायचे त्यापेक्षा सरकारनेच खाजगी बसगाडय़ा चालवायला घ्याव्यात असेही कळंगुटकर यांनी सांगितले आहे.
सरकारने आधारभूत किमंत द्यावी : ताम्हणकर
सरकारने प्रती किलोमीटरमागे 40 रुपये प्रमाणे आधारभूत किमंत द्यावी असे दुसऱया बसमालक संघटनेचे अध्यक्ष सुदीप ताम्हणकर यांनी सांगितले. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आर्थिक स्थिती मंदावलेली आहे. बसमालकांनी अशाच बसगाडय़ा बंद ठेवल्या तर बसमालकांचीही स्थिती बिकट होईल. त्यांनांही सरकारकडेच मदत मागावी लागेल. सध्या प्रायोगिक तत्वावर बसगाडय़ा सुरु केल्या असून येत्या चार पाच दिवसात परिस्थितीचा आढावा घेऊन सरकारकडे प्रस्ताव मांडणार असल्याचेही ताम्हणकर यांनी सांगितले.
अवघ्याच बसेस आल्या रस्त्यावर
प्रतिनिधी / मडगाव
दक्षिण गोव्यात काल मंगळवारी अवघ्याच खाजगी बसेस रस्त्यावर आल्या. परंतु, त्यांना अपेक्षित प्रवासी देखील मिळाले नाही. त्यात सरकारने प्रवासी संख्येवर मर्यादा घातल्याने केवळ 50 टक्केच प्रवासी वाहतूक करावी लागत असल्याने, ती परवडत नसल्याचे मत बसमालकांनी व्यक्त केले आहे.
फोंडाöमडगाव, काणकोण-मडगाव, वास्को-मडगाव तसेच सांगे, केपे व कुडचडे-मडगाव या मार्गावरील खाजगी बसगाडय़ा जवळपास बंदच होत्या. जेमतेम एक-दोन बसगाडय़ा आल्या. परंतु, त्यांना अपेक्षित प्रवासी देखील मिळाले नाही. तसेच मडगाव शहरातील सीटी बसेस पूर्णपणे बंद राहिल्या. सासष्टीतील किनारपट्टी भागातून काही बसगाडय़ा काल सुरू झाल्या होत्या.
केवळ 50 टक्के प्रवासी वाहतूक करणे बसमालकांना परवडत नाही अशी माहिती बसमालक श्रीमती एन्जला कुतिन्हो यांनी दिली. दररोज किमान तीन हजार रूपये डिझेलवर खर्च येतो, त्या शिवाय ड्रायव्हर व कंडक्टर यांचा पगार ही गणिते कशीच जुळत नसल्याचे श्रीमती कुतिन्हो यांनी सांगितले. काही बस मालकांनी आपल्या बसगाडय़ा रस्त्यावर आणल्या खऱया परंतु, त्यांना प्रवासी मिळाले नाही. एक-दोन प्रवासी घेऊन बसगाडय़ा कशा चालवाव्यात असा सवाल त्यांनी उपस्थित केला.









