उच्च न्यायालयाचे न्यायाधीश के. एस. हेमलेखा यांचे प्रतिपादन, मुटकोर्ट स्पर्धेचा समारोप
प्रतिनिधी /बेळगाव
वकिली व्यवसाय करताना मुटकोर्ट स्पर्धा ही त्याला उपयोगी पडणारी स्पर्धा आहे. कोणत्याही व्यवसायामध्ये प्रामाणिकपणा व परिश्रम केल्यास ती व्यक्ती निश्चितच उंचीवर पोहोचू शकते. त्याचप्रकारे वकिली व्यवसायामध्ये तरुण पदवीधरांनी कठीण परिश्रम घ्यावेत आणि स्वतःची व समाजाची प्रगती साधावी, असे प्रतिपादन धारवाड खंडपीठाच्या उच्च न्यायालयाचे न्यायाधीश के. एस. हेमलेखा यांनी केले.
आर. एल. लॉ कॉलेजमध्ये राष्ट्रीय पातळीवरील मुटकोर्ट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तीन दिवसीय बारावे एम. के. नंबीयार राष्ट्रीय मुटकोर्ट स्पर्धेच्या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कायद्याविषयी जाणून घेण्याची तळमळ असली पाहिजे. पक्षकाराला न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावीपणे युक्तिवाद केला पाहिजे. त्यामुळे न्यायालयाचा भार निश्चितच हलका होऊ शकतो. ग्राहकाला खटल्यातील सत्य परिस्थिती पटवून दिली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
वकिली हा उदात्त व्यवसाय
वकिली हा एक उदात्त व्यवसाय मानला जातो. तेव्हा या व्यवसायावर प्रेम केले पाहिजे. त्यामधील प्राविण्य, अनुभव या चांगल्या गोष्टी असतील तर ती व्यक्ती उत्तम कायदेपंडित बनू शकते, असे ते म्हणाले. राष्ट्रीय मुटकोर्ट आयोजित केल्याबद्दल त्यांनी महाविद्यालयाचे तसेच विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले केएलएसच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष पी. एस. सावकार यांनीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला मुख्य जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश सी. एम. जोशी, ज्ये÷ वकील आर. एम. कुलकर्णी, केएलएसच्या प्रशासन मंडळाचे अध्यक्ष एम. आर. कुलकर्णी, प्राचार्य डॉ. एच. हवालदार, मुटकोर्टच्या समन्वयक अश्विनी परब उपस्थित होत्या.









