प्राप्तिकर विभागाच्या आकडेवारीतून माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
प्राप्तिकर विभागाने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार 1 एप्रिल ते 15 ऑक्टोबर या कालावधीत 38.11 लाखापेक्षा अधिक करदात्यांना 1.23 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकचा परतावा दिलेला आहे. यामध्ये 33,442 कोटींचा वैयक्तिक परतावा हा 36.21 लाख करदात्यांना दिलेला आहे.
तर 1.89 लाखापेक्षा अधिकच्या करदात्यांना कॉर्पोरेट कर परताव्याच्या स्वरुपात 90,032 कोटी रुपयांचा प्राप्तीकर दिला असल्याची माहिती यावेळी सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस(सीबीडीटी)कडून देण्यात आली. कॉर्पोरेट कर परताव्यात 38.11 लाखांपेक्षा अधिक करदात्यांना चालू आर्थिक वर्षात 15 ऑक्टोबरपर्यंत 1,23,474 कोटींपेक्षा अधिकचा परतावा दिलेला आहे. 36,21,317 प्रकरणांमध्ये 33,442 कोटींचा प्राप्तीकर परतावा सादर केला आहे.
सप्टेंबरच्या 29 तारखेपर्यंत 33 लाखांपेक्षा अधिकच्या करदात्यांनी 1.18 लाख कोटींचा परतावा दिलेला होता. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक वर्ष 2018-19 साठीचा आयटीआर नोव्हेंबर 30 पर्यंत सादर करता येण्याची मुभा देण्यात आली आहे. या अगोदर 30 सप्टेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली होती. सदरच्या निर्णयामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.









