जि. प. शिक्षण विभागाकडे सुमारे 400 प्रस्ताव प्राप्त
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोनाच्या सावटामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या रखडलेल्या जिल्हांतर्गत विनंती बदल्यांना येत्या पंधरवडय़ात मुहूर्त मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हाभरातून सुमारे 400 प्रस्ताव शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले आहेत.
कोरोनाच्या संकटात चालूवर्षी अधिकारी-कर्मचाऱयांच्या बदल्या न करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र, हा निर्णय घेतानाच अत्यावश्यक, घरगुती तसेच वैद्यकीय कारणास्तव बदली हवी असलेल्या कर्मचाऱयांसाठी विनंती बदल्यांबद्दल सरकार गांभीर्याने विचार करत होते. त्यावर निर्णय झाल्याने या बदल्या तत्काळ करण्याच्या सूचना देण्यात आल्याने जि. प. प्रशासन स्तरावरून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
गेल्या काही वर्षांपासून कर्मचाऱयांच्या बदल्यांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे. विशेष करून शिक्षकांच्या बदल्यांना विशेष महत्व आले आहे. सध्या बदल्या हा कर्मचाऱयांसह अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचा जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. बदल्यांमध्ये राजकारण येत असल्यामुळे नेहमीच चर्चेचा विषय बनतो. अनेकवेळा बदल्या राजकीय पदाधिकाऱयांसाठी प्रतिष्ठेचा विषय होतो. काहीवेळा तर हा वाद अगदी शेवटच्या टोकापर्यंत जाऊन पोहोचतो. अलिकडच्या काळात तर अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यात संघर्ष पहायला मिळतो.
सरकारने बदल्यांबाबत घेतलेल्या भूमिकेवर अधिकारी व कर्मचानीवर्गातून नाराजीचा सूर उमटत आहे. तसेच अत्यावश्यक, घरगुती व वैद्यकीय कारणास्तव अधिकाऱयांना विनंती बदलीची मुभा द्यावी, अशी मागणी मध्यंतरी कर्मचाऱयांच्या संघटनांनी सरकारकडे केली होती. कर्मचाऱयांच्या भावनांचा आदर करीत सरकार विनंती बदल्या देण्यावर विचार करण्यात येऊन तसा आदेशच काढण्यात आला. मात्र, या बदल्या करताना ज्या कारणास्तव बदल्यांसाठी अर्ज आले, त्याची सत्यता पडताळून मगच निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर जिल्हा परिषद शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या शासनाकडून रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र विंनती बदल्या तत्काळ कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या. प्रशासकीय बदल्या होत नसल्याने मागील वर्षीच्या ऑनलाईन बदल्यांमध्ये दुर्गम भागात नियुक्ती मिळालेल्या काही शिक्षकांनी यंदा विनंती बदलीसाठी अर्ज केले होते. कोरोनामुळे शैक्षणिक सत्र अजूनही सुरु झालेले नसल्याने नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याचा सध्या तरी प्रश्न नाही. विनंती बदल्यांची प्रक्रिया त्वरित व्हावी, अशी अनेक शिक्षकांची इच्छा आहे. ती प्रक्रिया महिनाभर पुढे ढकलण्यात आली होती. या संदर्भात पुन्हा चर्चा सुरु झाली असून येत्या 15 दिवसात त्यावर कार्यवाही होण्याची शक्यता शिक्षण विभागाच्या वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.









