जि.प.च्या शाळा दुरूस्तीसह नवीन वर्गखोल्यांसाठी हवेत पावणेचार कोटी
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हय़ातील सुमारे पावणेसातशेपेक्षा अधिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची दुरूस्ती निधीअभावी रखडली आहे. या शाळा दुरूस्तीसाठी व नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी 13 कोटी 73 लाखांचा निधीची गरज आहे. ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर नियोजनची आढावा बैठक लागणार असून जिल्हा नियोजनमधून यासाठी किती निधी प्राप्त होणार, याकडे लक्ष लागले आहे.
यावर्षी कोरोनामुळे नवे शैक्षणिक वर्षांच्या प्रारंभासमोर अजूनही प्रश्न उभा आहे. कोरोनाने अजूनही शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा उभी आहे. अशा या काळात निसर्ग चक्रीवादळात उत्तर रत्नागिरीतील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांच्या इमारतींचे मोठे नुकसान झाले होते. जिह्यात अडीच हजार प्राथमिक शाळा असून 50 टक्केपेक्षा अधिक शाळा जुन्या आहेत. या शाळांना अनेक वर्षे दुरुस्तीसाठी निधी न मिळाल्याने दुरूस्तींची कामे ऐरणीवर आली आहेत.
यावर्षी कोरोनामुळे 33 टक्केच निधी जिह्याला मिळणार होता. मात्र शासनाने काही दिवसांपूर्वी नियोजनचा 100 टक्के निधी देऊ, असे आश्वासन दिले आहे. यावेळेस शिक्षण विभागाकडून शाळा दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पीय नियतवयातून 7 कोटीचा निधी मागण्यात आला आहे. तर दायित्वासाठी 1 कोटी 93 लाख रुपयांचा निधी मागितला आहे. इतक्या निधीतून सुमारे पावणेसातशे शाळांच्या दुरुस्तीची कामे होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. भविष्यात यामधून अधिकाधिक निधी मिळाल्यास दुरुस्तीचा प्रश्न कमी होणार आहे.
सर्व शिक्षा अभियानातून 45 शाळांना अडीच कोटी प्राप्त
शाळांच्या नवीन वर्गखोल्यांसाठी 6 कोटी 73 लाख अर्थसंकल्पीय नियतवयातून आणि 1 कोटी 60 लाख रुपये दायित्वचे मागण्यात आले आहेत. एकूण सुमारे 13 कोटी 73 लाख रुपयांचा निधी लागणार आहे. सर्व शिक्षा अभियानातून नवीन वर्गखोल्यांसह शाळा दुरुस्तीसाठी 45 शाळांना अडीच कोटी रुपये प्राप्त झाले असल्याने जि. प. कडून समाधान व्यक्त केले जात आहे.
.









