राजापूर-भालावलीत जमिनीच्या वादातून झाला हल्ला
राजापूर
महाविद्यालयातून सुटल्यानंतर आडवाटेने घरी जाणाऱया 2 महाविद्यालयीन तरूणींवर हल्ला करून त्यांना दांडक्याने जबरी मारहाण करण्यात आली असून यामध्ये एका तरूणीचा जागीच मृत्यू तर दुसरी तरूणी गंभीर जखमी झाली. राजापूर तालुक्यातील भालावली येथे बुधवारी दुपारी 11 च्या दरम्यान ही घटना घडली. गावातील ग्रामपंचायत निवडणुकीपासून धुमसणारा भावकीतील वाद आणि जमीन-जुमल्याच्या वादातून हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे.
या घटनेमध्ये साक्षी मुकुंद गुरव (22, रा. भालावली, वरची गुरववाडी) हीचा जागीच मृत्यू झाला. तर सिध्दी संजय गुरव (22 रा. भालावली, वरची गुरववाडी) ही जखमी झाली असून तिला अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणी संशयित आरोपी विनायक शंकर गुरव (55, रा. वरची गुरववाडी) याला नाटे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिध्दी संजय गुरव व साक्षी मुकुंद गुरव या दोघी भालावली वरची गुरववाडी येथील रहिवासी असून धारतळे येथील सिनियर कॉलेज येथे शिकत होत्या. महाविद्यालय सुटल्यानंतर सकाळी 11 वाजता नेहमीप्रमाणे दोघी नेहमीच्याच पण आडवाटेने घरी निघाल्या होत्या. याच वाटेवर विनायक शंकर गुरव हा दबा धरून बसला होता. त्याने समोरून सिद्धीला येताना पाहिले आणि तिच्यावर दांडक्याने हल्ला केला. यात घाबरून गेलेल्या सिद्धीला वाचवण्यासाठी साक्षी पुढे आली. साक्षी मध्ये आल्यानंतर विनायकने आपला मोर्चा साक्षीकडे वळवला आणि तिच्यावर दांडक्याने हल्ला केला. तिचा गळा आवळला.
याचदरम्यान जखमी झालेल्या सिद्धीने आपल्या मोबाईलवरून घरी संपर्क साधत झालेली घटना सांगितली. तोपर्यंत विनायक तिथून पळून गेला होता. हल्ल्याची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबीयांनी नाटे पोलिसांनी माहिती दिली आणि घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेत असलेल्या साक्षी व सिध्दीला तत्काळ धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत साक्षी मृत झाली होती. गंभीर जखमी झालेल्या सिध्दीला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात रत्नागिरी येथे हलवण्यात आले.
दरम्यान सिद्धीने माहिती दिल्यानंतर नाटे पोलिसांनी विनायकचा पाठलाग करत त्याला तत्काळ ताब्यात घेतले. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेची माहिती मिळताच नाटेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासो पाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱयांनी तत्काळ घटनास्थळी जावून पाहणी केली. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, लांजा यांनीही भेट देत माहिती घेतली. या घटनेनंतर मोठय़ा संख्येने भालावलीतील ग्रामस्थ धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात गोळा झाले होते.
गावात मागवला पोलीस बंदोबस्त
ग्रामपंचायत निवडणुकीपासून गावात दोन गटात वाद धुमसत होता. त्यातच जमीन-जुमल्याचाही वाद सुरू होता. या वादातून हा हल्ला झाल्याची चर्चा परिसरात सुरू असून मोठय़ांच्या वादात एका निष्पाप तरूणीला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्तही मागवण्यात आला आहे.









