जिल्हाधिकाऱयांनी लक्ष घातल्यास प्रश्न सुटेल
प्रतिनिधी/ सातारा
सध्या गाजत असलेला प्रांत कार्यालयातले पार्किंग एका वेगळ्या वळणावर पोहचले आहे. प्रांत कार्यालयाच्या इमारतीसमोर असलेल्या मोकळ्या जागेत पार्किंग करण्यासाठी दुमजली इमारत उभी करण्याचा ठराव पालिकेच्या 2 नोव्हेंबर 2017 च्या सर्वसाधारण सभेत मंजूर झाला आहे. त्याचे काम अंतिम मंजुरीत आले असून येत्या काही दिवसात पार्किंगचा प्रश्न मिटणार आहे, अशी माहिती नगरसेविका सीता हादगे यांनी दिली आहे.
प्रांत कार्यालयात आवारात पार्किंगवरून मारामारीचा प्रकार घडला होता. बाहेर ग्रेड सेपरेटरमुळे प्रांत, तहसील, मुद्रांक, भूमी अभिलेख कार्यालयात येणाऱया नागरिकांना वाहने लावण्यास जागा नाही. तसेच स्टँप व्हेंडरकडे येणाऱया नागरिकांची वाहने बाहेर उभी करावी लागत आहे. कोरोनाचे कारण देत पार्किंग बंद करण्यात आले असल्याने मुद्दा गाजू लागला आहे. नगरसेविका सीता हादगे यांनी भविष्यात पार्किंगचा प्रश्न उद्भवणार हे गृहित धरून पालिकेत सर्वसाधारण सभेत विषय मंजूर करून घेतला होता. त्यामध्ये दि. 2 नोव्हेंबर 2017 ला झालेल्या सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक 17 व ठराव नंबर 149 सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार पाठपुरावा सीता हादगे यांच्याकडून सुरू असून त्या माहिती देताना म्हणाल्या प्रांत ऑफिस समोरील सि. स. 507 सदरबजार येथील आरक्षण क्रमांक 159 च्या ठिकाणांची पार्किंग आरक्षण असलेली जागा तहसिल कचेरी समोरील बगीच्या असून या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून दुमजली पार्किंग करण्याचा विषय मंजूर करण्यात आला आहे.
ती जागा जिल्हाधिकाऱयांच्या अखत्यारीतील असून त्यांनी ती ची जागा नगरपालिकेकडे वर्ग केल्यास त्यावर नगरपालिकेचे नाव दाखल केल्यास त्या ठिकाणी दुमजली पार्किंग बांधले जाईल. हा जो काही पार्किंगचा बट्टय़ाबोळ आणि नागरिकांना होणारा त्रास होत आहे. तो बंद होईल. शहरातील आणि बाहेरगावाहून येणाऱया नागरिकांची पार्किंगची सुविधा सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून पूर्ण केली जाईल. यासाठी मी प्रभागातील नगरसेविका या नात्याने 2014 पासून ते आज अखेरपर्यंत या वाहनतळाच्या जागेसाठी सर्व कागदपत्रांचा पाठपुरावा केलेला असून जिल्हाधिकारी कार्यालयातून काम होणे बाकी आहे. ते काम जिल्हाधिकारी यांनी मार्गी लावल्यास प्रभाग एक मध्ये दुमजली आणि सुसज्ज असे पार्किंग याठिकाणी बांधण्यात येईल. यासाठी तातडीने जिल्हाधिकारी साहेबांनी यामध्ये लक्ष घालावे, असे त्यांनी सांगितले.








