प्रतिनिधी/ गोडोली
प्रांत कार्यालयाच्या आवारातील दस्त लेखनिक, पिटीशियन रायटर, मुद्रांक विक्रेते यांनी केलेल्या अतिक्रमणाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक लिपारे यांनी आंदोलन केले होते. या दरम्यान 15 जानेवारी अखेर पर्यंत सदर प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची लेखी हमी अधिकाऱयांनी दिली होती. याबाबत मंगळवार दि. 14 रोजी झालेल्या बैठकीत कारवाईची रूपरेषा निश्चित करण्यात आली असून काही दिवसात अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचे मिनाज मुल्ला यांनी तरूण भारतशी बोलताना सांगितले.
तर 15 जानेवारी पर्यंत अतिक्रमण काढण्यात आले नाही तर दि. 26 जानेवारी रोजी प्रजासताक दिनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष राहूल पवार आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक लिपारे यांनी आंदोलन करणार असल्याचा संबंधित अधिकाऱयांना इशारा दिला आहे.
दस्त लेखनिक, पिटिशियन रायटर, मुद्रांक विक्रेत्यांनी विना परवाना प्रांताधिकारी आवारात बेकायदेशीर पत्र्याचे शेड लाईटचा वापर शासकीय फर्निचर वापर करत असल्याचे उघड झाले आहे. मनमानी दराने नागरिकांना लुटणाऱया दस्त लेखनिक, पिटिशियन रायटर, मुद्रांक विक्रेत्यांच्या विरोधात सातत्याने संताप व्यक्त होत असतो. तर त्यांनी केलेल्या अतिक्रमणाला अधिकाऱयांच्याकडून संरक्षण मिळत असल्याचा आरोप राहूल पवार आणि अशोक लिपारे यांनी केला आहे. या विरोधात आंदोलन करताना अतिक्रमण 15 जानेवारी अखेर योग्य ती कारवाई करू असे लेखी आश्वासन अधिकाऱयांनी दिले होते.
ही मुदत संपत आल्याने प्रांत कार्यालयाच्या आवारातील संबंधित अधिकाऱयांची बैठक मंगळवारी पार पडली. यात बांधकाम विभागाच्या सहकार्यातून अतिक्रमण काढण्यात येईल. तसेच यापुर्वी काही अधिकाऱयांनी बसण्याची व्यवस्था करण्यास परवानगी दिली. पण त्यांनी कुठे बसावे हे निश्चित नसल्याने त्यांचा गैरफायदा दस्त लेखनिक, पिटिशियन रायटर, मुद्रांक विक्रेत्यांनी सोईने करून घेतला आहे.
प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी संबंधित बैठकीत पुढील कारवाई निश्चित झाली आहे. 10 दिवसात नियमानुसार योग्य ती कारवाई होईल असे सांगितले. तर राहूल पवार आणि अशोक लिपारे यांनी प्रशासनाकडून कोणतीच ठोस कारवाई अद्याप न झाल्याबद्दल अधिकाऱयांकडे नाराजी व्यक्त केली आहे. प्रजासत्ताक दिनी दि. 26 जानेवारी रोजी बेमुदत तीव्र आंदोलन करणार असल्याचे तरूण भारतशी बोलताना सांगितले.
वाहतूक कोंडीला पर्याय-
प्रांत आवारातील अतिक्रमण आणि बेशिस्त पणे वाहने लावल्याने वाहतूक केंडी नित्याची झाली आहे. अधिकाऱयांना ये-जा करताना त्यांच्या त्रास होत असतो. तरीही त्यांच्याकडून कोणतीच कारवाई आणि पर्याय व्यवस्था आज अखेर केली गेली नाही. मात्र नव्या मास्टर प्लॅन मध्ये बांधकाम विभागाच्या सहकार्यातून वाहतूक कोंडी होणार नाही, अशी व्यवस्था करणार असल्याचे मिनाज मुल्ला यांनी सांगितले.









