प्रकाशमान स्यमंतकमणी घेऊन तो सिंह गिरीकंदरात फिरू लागला. त्याला जांबवंताने पाहिले. तो स्यमंतकमणी मिळवण्याच्या इच्छेने जांबवंताने त्या सिंहाला ठार मारले व स्यमंतकमणी घेऊन त्याने आपल्या गुहेत प्रवेश केला.
बिळीं प्रवेशोनि आह्लादें । स्वपुत्राचिये पाळणामोदें। खेळणें करूनि मणि तो बांधे । परमानंदें उज्ज्वलित। स्यमंतकमणीचिया प्रकाशें । विवरामाजील ध्वान्त नासे । समृद्धिमंत स्वर्गा ऐसें। विवर विलसे देदीप्य। असो जाम्बवताची कथा । प्रसेन न दिसे मागुता येतां। वनोपवनीं न लभे वार्ता। अनुगीं हुडकितां सर्वत्र । एक वेंघोनि गिरिशिखरें । हांका मारिती दीर्घ स्वरें । मार्गस्थ देखोनि किंकर त्वरें। धांवोनि घाबरे त्यां पुसती ।एकीं सत्राजिताच्या सदनीं। हांक नेली द्वारकाभुवनीं । सवेंच अनुयायी मागूनी । आले धांवूनि आक्रंदत ।शोक करिती स्त्रिया बाळें । म्हणती प्रसेन ग्रासिला काळें । सिंहें सर्पें कीं शार्दूळें। किंवा भक्षिला निशाचरिं। अश्वेंसहित पर्वतपतन । कीं लवणार्नवीं गेले प्राण । किंवा तृषातें जलेंवीण। पावला मरण रवितापें । रविदत्त कंठीं असतां मणि । क्षुधेतृषेची न बाधी ग्लानि । तंव सत्राजितें आक्रंदोनी। तर्किलें मनीं तें ऐका ।
जांबवंताने तो स्यमंतकमणी मोठय़ा प्रेमाने आपल्या मुलाच्या पाळण्यावर खेळणे म्हणून बांधला. स्यमंतकमण्याच्या प्रकाशाने ते विवर प्रकाशून निघाले. त्या गुहेतील काळोख कुठल्या कुठे पळाला. समृद्ध स्वर्गासारखे ते विवर देदीप्यमान दिसू लागले. इकडे प्रसेन परतलेला दिसला नाही. त्याच्याबरोबर शिकारीसाठी जे सैनिक निघाले होते, त्यांनी त्याचा खूप शोध घेतला. पण प्रसेन सापडला नाही. काही सेवक गिरीकंदरात फिरून त्याला मोठय़ाने हाकारे देऊन बोलवू लागले. वाटेवर कोणी वाटसरू दिसला तर घाबरे घुबरे होऊन ते सेवक प्रसेन कुणी कुठे पाहिला काय, याची चौकशी करू लागले. कोणी द्वारकेमध्ये सत्राजिताच्या घरी येऊन प्रसेन हरवल्याची बातमी दिली. त्याच्या पाठोपाठ प्रसेनाचे सेवक आक्रंदत, रडत धावत आले. स्त्रिया बाळे शोक करू लागली. प्रसेनाचा मृत्यू झाला काय? कोणी सर्पाने, सिंहाने, वाघाने किंवा निशाचराने त्याला खाऊन टाकले काय? तो घोडय़ासकट पर्वतावरून खोल दरीत पडला असावा किंवा समुद्रात बुडाला असावा किंवा पाणी प्यायला न मिळाल्याने तहानेने व्याकूळ होऊन त्याचा जीव गेला असावा किंवा सूर्याच्या प्रखर किरणानी होरपळून तो मेला असावा. पण स्यमंतकमणी गळय़ात असताना त्याला भूक किंवा तहानेने मृत्यू येणार नाही. अशी चर्चा लोक करू लागले. त्यावेळी आक्रंदन करून सत्राजिताने काय तर्क केला
पहा-
बहुतेक मणि याचिला कृष्णें । म्या भंगिलें त्याचिया तृष्णे । मानसीं गुल्म धरूनि तेणें । प्रसेनप्राण घेतला। परम प्रियतम माझा भ्राता। ग्रीवामंडित स्यमंतक असतां । मृगयार्थ वना गेला होता । कृष्णें तत्त्वता तो वधिला । ऐसी शोकोर्मीमाझारिं । वदली सत्राजिताची वैखरी । हें वाक्मय पडतां जनांच्या श्रोत्रीं । परस्परिं तें श्रुत करिती ।
Ad. देवदत्त परुळेकर








