प्रसारमाध्यमांचे आज अनेक प्रकार आहेत. ही माध्यमे बातम्या बरोबरच आपले विविध प्रकारे मनोरंजनदेखील करतात. कधी सोशल मीडिया असो, चित्रपट, गाणी तर कधी छापील माध्यम. मी दूरचित्रवाणी व डिझाईन क्षेत्राचा 4 वर्षे अभ्यास केला आहे आणि एका वर्षापासून मीडिया क्षेत्रात काम करत आहे. म्हणूनच मला त्या मोठय़ा पांढऱया पडद्यामागे नक्की काय घडते हे बऱयापैकी समजले आहे. आणि याच अनुभवावरून मी तुम्हाला हे सांगू शकते की प्रसारमाध्यमांचा आपल्या दररोजच्या आयुष्यावर आणि समाजाच्या मानसिकतेवर खूप मोठा प्रभाव आहे. कितीवेळा आपण त्या देखण्या निर्दोष कलाकारांकडे पाहिले आहे आणि त्यांच्यासारखे होण्याची इच्छा मनात बाळगली आहे? मीही तो विचार केला आहे. कारण भारतात तरी अभिनेता-अभिनेत्री फक्त कलाकार नसून, एक परिपूर्ण आयुष्य आहेत. त्यांचे सुंदर कपडे, राहणीमान, ग्लॅमर, सगळे खूप मोहक वाटते. ते ग्लॅमरयुक्त जीवन बघून आपल्याला स्वतःचे आयुष्य कमकुवत वाटायला लागते. माणूस आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात कितीही यशस्वी असला तरी, जोपर्यंत तो नट-नटय़ांसारखे रूप प्राप्त करत नाही, तोपर्यंत तो यशस्वी नाही. असे वाटायला लागते की त्या अभिनेता-अभिनेत्रींसारखे आपले शरीर रूपवान नसले तर आपण
प्रेम मिळायला अपात्र ठरतो.
अतिशयोक्तीपूर्ण चित्रपटात किती वेळा आपण रोमिओ-जुलियटच्या कथेवरून प्रभावित प्रसंग पाहिले आहेत? किती वेळा आपल्या मनात विचार आला असेल की शाहरुख खानसारखा एखादा रक्षणकर्ता अगदी घोडय़ावर नाही तर एखाद्या गाडीवर बसून आपल्या समोर येईल? कितीवेळा आपण एखाद्या अभिनेत्याला शून्यातून श्रीमंतीकडे फक्त 3 तासात जाताना पाहिले आहे आणि अचानक जग बदलायची प्रेरणा मनामध्ये निर्माण झाली आहे?
हा सगळा विचार करत असताना आपल्याला हे लक्षात येत नाही की गरिबी ते श्रीमंतीच्या प्रवासात नक्की किती अडथळे असतात आणि त्या दोन्हीमधले अंतर हे तीन तास काय, कधी कधी पार करायला आयुष्य निघून जाते. सिनेमातला हिरो प्रत्येक वेळेला यशस्वी ठरतो, मग त्याने कोणताही मार्ग निवडला तरी चालेल. यामुळे आपल्या मनात बनावटी अपेक्षा निर्माण होतात. आपल्या मनावर हे बिंबवले जाते की तुम्ही अपयशी ठरलात तर तुम्ही आदरयोग्य नाही. माणूस हा एक परिपूर्ण प्राणी नसून सदोष जीव आहे हे ही माध्यमे मान्य करतच नाहीत. वास्तविक जीवनाचे जाऊ दे, एका अभिनेत्याचा पेहराव व्यवस्थित ठेवायलाच तास न् तास जातात. तो देखावा जपायला एक वेगळा गट नेमलेला असतो, जो सतत त्याच्या पुढे मागे करून या गोष्टींची काळजी घेत असतो. हा सर्व त्या अभिनेता-अभिनेत्रींच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे, कारण त्यांच्या व्यवसायाचा तो एक भागच आहे. तरीही आपण त्या कलाकारांना समाजात असामान्य दर्जा देतो आणि त्या देखाव्यावरून आपण त्यांचे वर्चस्व ठरवतो. चित्रपट, सोशल मीडिया हे रोजच्या आयुष्यापासून माणसाचे मन इतर ठिकाणी वळवण्याचे साधन आहे. माणसांनी जगात सगळे काही बघितले आहे. दारिद्रय़, श्रीमंती, चांगली माणसं, वाईट माणसं, चांगले दिवस आणि सगळय़ात वाईट दिवसदेखील. म्हणजे आपण या जगात जे बघत नाही तेच आपल्याला हे प्रसारमाध्यम दाखवण्याचा प्रयत्न करत. सर्व प्रसार माध्यमे माणसाला या काल्पनिक जगाच्या मोहात पाडण्यात अगदी यशस्वी झाली आहेत. इतकी यशस्वी झाली आहेत की माणसाला ते काल्पनिक जग हे वास्तव्य वाटायला लागले आहे. समाजात आदर्श पुरुष, आदर्श स्त्री, नाती आणि आदर्श प्रसंग या सगळय़ांची व्याख्या आता प्रसारमाध्यमातील देखाव्यावर आधारित झाली आहे.
माणसाच्या आयुष्यात कोणतीही अडचण आली की त्याला सामोरे जायच्या आधी त्याच्या मनात हाच विचार येतो की एखादी जादूची छडी त्याला मिळावी आणि सिनेमात दाखवतात तसे एका झटक्मयात त्याचे जग पुन्हा एकदा खुशाल व्हावे. मग त्या वेदनेचे वास्तव न समजता माणूस स्वप्नरंजित दुनियेत हरवून जातो. हिंदी चित्रपटातील एका गाण्याची ही ओळ उदाहरण म्हणून घेऊया, ‘मैं जो जी रहा हू, वजह तुम हो.’ ऐकायला जरी हे खूप रम्य आणि सुंदर वाटत असले तरी कुठे ना कुठे, हे आपल्याला स्वतःच्या आनंदासाठी दुसऱया माणसावर अवलंबून राहायला शिकवत आहे. माणसाला जगायला एक उद्देश लागतो जो त्याला विविध कृत्ये करायला भाग पाडतो आणि ही माध्यमे माणसाला हे शिकवतात की त्याचा आयुष्याचा हेतू हा तो स्वतः नसून, दुसराच कोणीतरी आहे. मग मनात प्रश्न असाही येतो, की जगात कित्येक प्रकारची नाती आहेत आणि त्या नात्यांचे एक स्वतंत्र वैशिष्टय़देखील आहे. मग एखाद्या प्रेमसंबंधामुळेच आपल्या आयुष्याचे सार्थक होते का? हे जवळजवळ जणू असे सांगते की आपला जन्म हा फक्त प्रेम करायलाच झाला आहे. या सगळय़ा अतिशयोक्तीमुळे माणूस त्याच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची किंमत न ठेवता, त्याचे मोल हे त्याच्या कृत्यांवरून ठरवतो.
मी असे म्हणत नाही की ही सर्वच माध्यमे वाईट आहेत. त्याचे कित्येक फायदे देखील आहेत. घरबसल्या माणसाला जगाची अख्खी माहिती मिळते, नवनवीन माणसे, जागा, संस्कृती बघायला मिळते. प्रसारमाध्यमामुळे जगात नक्कीच क्रांती घडून आली आहे. माणूस आता जगातील घडामोडींबद्दल आधीपेक्षा जास्त जागरूक झाला आहे. सिनेमाविश्वात काही सिनेमे असे आहेत जे अतिशय अभूतपूर्व आहेत. पण असे सिनेमे समाजात कधी तेवढी अधिकृत मान्यता मिळवत नाहीत जेवढे सिनेमात अश्लील संवाद आणि नृत्य असलेली गाणी मिळवतात.
माणसाला जरी हे लक्षात आले ना की त्याचा या जगात येण्याचा हेतू पैसा, प्रसिद्धी, प्रेम, ग्लॅमर मिळवणे नसून आयुष्य पुरेपूर जगणे आहे, तर समाजातील बऱयाच समस्यांवर तोडगा मिळू शकेल. आयुष्यात वेदनांपासून कोणीच वाचले नाही, सगळय़ांना त्यांना सामोरे जावेच लागते. त्यावेळेला कोणतीही जादूची छडी येऊन आपल्याला वेदनामुक्त करणार नाही. हे अडथळे पार करायला धैर्य बाळगून कठोर परिश्रम करण्याशिवाय कोणाकडेच पर्याय नाही. आपल्या माणसांकडून अपेक्षा करणे वाईट नाही, पण त्या अपेक्षांमध्ये हरवून, त्या जशाच्या तशा पूर्ण झाल्या नाहीत म्हणून स्वतःला आणि दुसऱयाला त्रास देणे योग्य नाही. शाहरुखखानला जमत असेल 10 मजली इमारतीवरून उडी मारून नायिकेला वाचवायला, पण प्रेम व्यक्त करायच्या अनेक पद्धती आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. खरं प्रेम हे छोटय़ा छोटय़ा गोष्टींमधून दिसते, दिखाव्यातून नाही आणि या सगळय़ा अवास्तव अपेक्षांपासून माणूस मुक्त होईल तेव्हाच तो त्या मोठय़ा पांढऱया पडद्या पलीकडच्या आयुष्याचा मनमोकळे पणाने उपभोग घेऊ शकेल!
श्राव्या माधव कुलकर्णी