वार्ताहर/ अकोळ
वाचन संस्कृतीपासून दूर होत असणाऱया युवा वर्गाला वाचनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने येथील शिवभक्त युवकांनी आयोजित केलेल्या शिवकालीन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे कौतुक करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दक्षिण कोल्हापूर प्रचार प्रमुख शैलेंद्रजी पारेख यांनी केले. येथील शिवभक्त ग्रुपच्यावतीने आयोजित केलेल्या शिवकालिन प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांच्या पारितोषिक वितरण सोहळय़ात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
शिवाजी महाराजांचा इतिहास कथन करताना पारेख म्हणाले, हिंदू धर्माचे संरक्षण करण्यात मोलाचा वाटा असणाऱया राजे शिवाजी महाराजांचा प्रथम उल्लेख होणे गरजेचे आहे. अशा थोर सत्पुरुषाचा आदर सन्मान जिवंत ठेवण्याच्या हेतूने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे कौतुक करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रारंभी वैभव शिंदे यांनी शिवगर्जना घोषवाक्याचे कथन केले. रोहित रामनकट्टी यांनी प्रास्ताविक केले.
याप्रसंगी बोलताना श्रीराम सेना निपाणी तालुका प्रमुख श्रीनिवास चव्हाण म्हणाले, आजच्या शिक्षण पद्धतीच्या चुकीच्या धोरणामुळे कर्तृत्त्वान राजापेक्षा मुघलकालिन इतिहासावरच जास्त भर दिला आहे. तेंव्हा आजच्या युवकांनी शिवरायांच्या आदर्श विचार, तत्त्वांचे पालन करण्याची गरज असल्याचे सांगितले. समारंभात शिवरायांच्या आज्ञापत्राचे वाचन किशोर सुतार यांनी केले.
प्रश्नमंजूषा स्पर्धेत संतोष बन्ने प्रथम
समारंभात संयोजकांनी आयोजित केलेल्या प्रश्नमंजूषा स्पर्धेत 100 व्या प्रश्नाचे अचूक उत्तर दिल्याबद्दल संतोष मोहन बन्ने यांना प्रथम क्रमांक तर संदीप भारमल यांना द्वितीय क्रमांक देण्यात आला. विजेत्यांना पेठलाईन मित्रमंडळाचे अध्यक्ष माजी जि. पं. सदस्य चेतन स्वामी यांच्यावतीने शिवाजी सावंत लिखित छावा कादंबरी भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
51 ते 100 प्रश्नात साक्षी राऊत प्रथम
51 ते 100 प्रश्नात सर्वाधिक अचूक उत्तरे देणाऱया साक्षी राऊत हिने प्रथम तर प्रदीप राऊत याने द्वितीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना श्रीराम सेना हिंदूस्थान यांच्याकडून शिवकालिन कादंबरी देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी उद्योजक दिलीप चव्हाण, ऍड. उदय झिनगे, बाळासो पानारी, योगेश तावडे, स्वरुप बन्ने, राहुल देवर्डे, प्रसाद औंधकर, रावसाहेब मगदूम, अभिजीत कुलकर्णी, संजय गडकरी, बाहुबली मगदूम, सचिन कांबळे आदींसह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. संदीप मोहिते यांनी मान्यवरांचे स्वागत केले. तर रोहित रामनकट्टी यांनी आभार मानले.









