निविदा प्रक्रियेविना ३० केंद्रांना ४५ कोटींचे कंत्राट : एसआयटी मार्फत चौकशीची मागणी
सांगली : प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमध्ये (बार्टी) स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाच्या नावावर कोट्यवधींचा गैरव्यवहार झाला आहे. ‘बार्टी’ने राज्यात ३० ठिकाणी बँक, रेल्वे, एलआयसी आदी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रांसाठी कोट्यवधी रुपयांचे कंत्राट देताना कुठल्याही प्रकारची निविदा प्रक्रिया, अर्ज मागवणे किंवा संस्थांची तपासणी करणे, अशी कुठलीही कार्यवाही न करता आधी काम केल्याच्या आधारावर काही संस्थांच्या ३० प्रशिक्षण केंद्रांना पाच वर्षांसाठी ४५ कोटींचे कंत्राट देण्याचा आदेश ऑक्टोबर २०२१ मध्ये काढला. यासोबत पोलीस व मिलिटरी प्रशिक्षणाचेही विनानिविदा कंत्राट दिले आहे. सदर प्रशिक्षण केंद्राकडे कुठलाही अनुभव व पायाभूत सुविधा नसतानाही २१ कोटी ६० लाख रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. सदर गैरव्यवहाराची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी, दोषींवर कारवाई व्हावी, सदर सर्वच प्रशिक्षण संस्थेचे कंत्राट रद्द करून फेर निविदा प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी अशी मागणी रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनचे संघटना प्रमुख अमोल वेटम यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली.
काही संस्थांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिकाही दाखल केली आहे. मागासवर्गीय लोकांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या बार्टीसह सदर प्रशिक्षण संस्थेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.