गणेशोत्सव मंडळे-मूर्तिकारांचा सवाल -समाजहिताने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत;
बेळगाव / प्रतिनिधी
गणेशोत्सव साधेपणाने साजरा करून मंदिरांमध्ये श्रीमूर्तींची प्रति÷ापना करण्याचा निर्णय आम्हाला मान्य आहे. परंतु प्रशासनाला नेहमीच उशिरा जाग का येते? असा प्रश्न गणेशोत्सव मंडळे व मूर्तिकार करीत आहेत. यंदाही सार्वजनिक गणेशमूर्ती 4 चार फुटांपर्यंत असाव्यात, असा आदेश बेळगावच्या जिल्हाधिकाऱयांनी शुक्रवारी रात्री बजावला. शनिवारी सकाळी याबाबतची माहिती मंडळांना व मूर्तिकारांना समजली. ‘तरुण भारत’च्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क साधला. समाजहिताच्या दृष्टीने प्रशासनाचा निर्णय मान्य करतो. परंतु प्रशासन नेहमीच उशिरा का जागे होते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
समाजहिताच्यादृष्टीने ही भूमिका अत्यंत योग्य
-संजय किल्लेकर (मूर्तिकार, शाहूनगर)
सध्याची सर्वात मोठी समस्या आहे ती कोरोनाची. त्यामुळे नागरिकांचे जीव वाचावेत म्हणूनच प्रशासनाने ही भूमिका घेतली आहे. समाजहिताच्यादृष्टीने ही भूमिका अत्यंत योग्य आहे. यामुळे जरी मूर्तिकारांचे नुकसान होणार असले तरी या महामारीत व्यवसायाकडे बघून नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळणे उपयोगाचे नाही. परंतु हाच निर्णय यापूर्वी झाला असता तर मूर्तिकारांना आर्थिक तोटा बसला नसता, असे संजय किल्लेकर म्हणाले.
थोडा मोठा मंडप घालण्याची परवानगी द्यावी
-युवराज चव्हाण (अध्यक्ष-सिंहगर्जना युवक मंडळ, कोनवाळ गल्ली)
मागील वषीप्रमाणेच यावर्षीही मंदिरांमध्ये गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. परंतु अनेक मंडळांकडे मंदिरे नसल्याने त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण झाला आहे. मागीलवषी लहान मंडपांची परवानगी मिळाली. परंतु त्यामुळे सामाजिक अंतर राखता येत नव्हते. त्यामुळे थोडा मोठा मंडप घालण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी युवराज चव्हाण यांनी प्रशासनाकडे केली आहे.
समाजहित पाहून मूर्तींना आकार
-विनायक पाटील (मूर्तिकार, भांदूर गल्ली)
कोरोना असल्याने मूर्तिकारांनी यापूर्वीच 4 फुटांच्या आतच मूर्ती तयार केल्या आहेत. लहान मूर्ती करणे मूर्तिकारांना परवडणारे नसले तरी समाजहित पाहून मूर्तिकार त्या करीत आहेत. गणेशोत्सव महिनाभरावर आला तरी अद्याप मंडळांकडून म्हणावा तसा प्रतिसाद नसल्याने यावषी अत्यंत कमी सार्वजनिक मूर्ती तयार केल्याचे विनायक पाटील यांनी सांगितले.
प्रशासनाने घेतलेला निर्णय योग्य
-महादेव चौगुले (अध्यक्ष-सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, भांदूर गल्ली)
गणेशोत्सव हा उत्सव मोठा असल्याने गर्दी होणार हे निश्चित असते. त्यामुळेच प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. सध्याची एकूणच परिस्थिती पाहता प्रशासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. काही गोष्टींना मुरड घालून यावषी साधेपणाने नागरिकांनी गणेशोत्सव साजरा करावा. वायफळ खर्च टाळून उरलेला निधी अडचणीत असलेल्या नागरिकांना द्यावा, असे त्यांनी सांगितले.
नवनव्या नियमावलीमुळे मूर्तिकार अडचणीत
-विक्रम पाटील (मूर्तिकार, अनगोळ)
गणेशोत्सवाच्या माध्यमातून मूर्तिकारांनी आपली कला जोपासली आहे. परंतु प्रशासनाच्या नवनव्या नियमावलीमुळे मूर्तिकार अडचणीत सापडत आहेत. प्रशासनाने निर्णय घेतला तरी मूर्तिकारांच्या बाजूने कोणीच उभे राहताना दिसत नाहीत. मंडळेही मूर्तिकारांना प्रतिसाद देताना दिसत नाहीत. अशा प्रकारामुळे मूर्तीकलाच लोप पावेल, अशी भीती विक्रम पाटील यांनी व्यक्त केली.








