100 च्या वर ग्रामस्थांवर गुन्हे दाखल
प्रतिनिधी/ वाई
बावधन (ता. वाई) येथील बगाड यात्रा पारंपारिक पध्दतीने शुक्रवारी साजरी करण्यात आली. जिल्हा व तालुका प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवीत बावधनकरांनी शेकडो वर्षे जुनी परंपरा जपली. जुने बगाड गावातच ठेवून नवीन बगाड तयार करीत बावधनकरांनी प्रशासनाला अंधारात ठेवत पहाटेच्या अंधारातच बगाड पारंपारिक पध्दतीने बैलांच्या सहाय्यानेच सकाळी 9.30 च्या सुमारास गावात आणले. यावेळी पोलीस प्रशासनाने अटकाव केला परंतू त्याला ग्रामस्थांनी जुमानले नाही. पोलीस प्रशासनाच्यावतीने गावपुढाऱयांसह ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बावधन गावाने राज्यात आपल्या देवासाठी गुन्हे अंगावर घेवून ऐतिहासिक परंपरा जपून एक नवा इतिहास रचून काशिनाथाचे चांगभले या धारदार वाक्याला सामुहिक भक्तीची एक नवी झालर लावल्याने गावकऱयांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, परवानगी नसताना प्रशासनाचा आदेश झुगारत बगाड काढल्याबद्दल सुमारे 120 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
या बगाड यात्रेची पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी गंभीर दखल घेऊन कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. प्रशासनाचा आदेश झुगारल्यामुळे सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रशासन व वाई पोलिसांच्याकडून बावधन गावामध्ये धरपकड सत्र सुरु झाले असून आतापर्यंत अंदाजे 60 च्या आसपास लोकांना ताब्यात घेण्यात आले असून अजूनही हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, संपूर्ण राज्यात व देशात प्रसिध्द असलेल्या बावधन बगाड यात्रेवर जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासनाने कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर बंदी घातली होती. यामुळे शेकडो वर्षाची परंपरा असलेला बगाड उत्सव बावधन ग्रामस्थ कसा साजरा करणार याकडे जिल्हय़ासह राज्याचे लक्ष लागून राहिले होते. तर महसूल व पोलीस प्रशासनानेही बगाड रोखण्यासाठी चंग बांधला होता. यामुळे बावधन गावाला पोलीस छावणीचे स्वरुप आले होते. तरी देखील बगाडय़ा व बगाड पोलिसांच्या शेवटपर्यंत हाती न लागल्याने भाविकांना ही बगाड यात्रा सहजपणे साजरी करता आली.
बावधन ग्रामस्थांनी मात्र एकीचे दर्शन घडवत आपली पिढय़ानपिढय़ांची असलेली धार्मिक व ऐतिहासिक परंपरा पुन्हा एकदा जपल्याचे दिसून आले. बगाडासाठी ग्रामस्थांनी कमालीची एकी व जिद्द दाखवत गेल्या महिनाभरापासून बगाडाच्या सर्व विषयांची चर्चा सार्वजनिक होवू नये अशी गुप्तता राखली. गेल्या चार दिवसापासून जिल्हा पोलीस दलातील दंगा नियंत्रण पथकाची एक तुकडी गावाच्या चावडी शेजारी असणाऱया चौकात लावण्यात आली होती. खडा पहारा गावात असूनही पोलिसांना शेवटपर्यंत बगाडय़ा कोण हे समजू शकले नाही तर रातोरात बैल जोडय़ा गावच्या शिवारातून बगाडासाठी सोनेश्वर येथे दोन दिवस आधीच नेण्यात आल्या होत्या. दरवर्षी बगाडाचे साहित्य नवीन आणण्याचे येथील उत्सव समिती करत असते. ऐनवेळी बगाड ओढताना त्यात काही बिघाड अथवा मोडतोड झाल्यास तत्काळ पर्यायी व्यवस्था करण्यासाठी बगाडाचे डबल साहित्य आणण्यात येते. यावर्षी महसूल खात्याने कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी 144 कलम लागू होताच आणि वाढलेल्या पोलीस बंदोबस्ताला गुंगारा देण्यासाठी बावधन गावच्या भाविकांनी जुने बगाड हे गावातच ठेवून त्याला कसलाही हात न लावता पोलीस प्रशासनाला खात्री वाटावी म्हणून त्याचा यावर्षी वापरच न केल्याने महसूल व पोलीस प्रशासन वापर न केलेल्या बगाडाकडेच बघून यंदा बगाड हे निघणारच नाही अशी खूणगाठ या दोन्ही प्रशासनाने आपापल्या मनाशी बांधून कारभार हाकत होते. पण बावधनकर बाकी अतिशय धूर्त विचाराने वागून त्यांनी अवघ्या पंधरा दिवसात नवीन बगाडाची यंत्रणा उभी करून तो सोनेश्वर येथे विधिवत पुजा करून दि. 2 च्या पहाटे 6.30 वाजण्याच्या सुमारास कौल मिळालेल्या बगाडय़ाला बगाडावर चढवून त्या ठिकाणी रिवाजाप्रमाणे पाच फेऱया काढण्यात आल्या.
यावेळी महसूल व पोलीस दल उघडय़ा डोळयांनी पहात होते. हे बगाड सकाळी शिस्तीने निघून कुठलाही अनुचित प्रकार न घडता अंदाजे शेकडो बैलांच्या जोडय़ा लावून हाकत सकाळी 9 च्या सुमारस वाई-सातारा रस्त्यावर नेत असताना त्यावेळी जिल्हा पोलीस दलातील अतिरिक्त पोलीस अधिक्षक धिरज पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने वाई-सातारा रस्त्यावर बगाड आल्यानंतर ग्रामस्थांशी चर्चा केली. कोरोना रोगाचे दुष्परिणाम भयंकर होतात. याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. आपण आपली परंपरा जपली परंतू येथे येणाऱया भाविकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम भोगायला लागू शकतात. याचे भान बावधनकर कसे विसरले असे सुनावले. तत्काळ बगाड गावात पोहचविण्याचे आदेश दिले.
दरवर्षी हे बगाड सकाळी 7 वाजता लाखो भाविकांच्या दर्शनासाठी सज्ज ठेवून शेताशेतातून वाटचाल करीत असते. त्यावेळी त्याला गावात पोहचायला सायंकाळचे 5 वाजतात. यावेळी मात्र अवघ्या तीन तासात हे बगाड जाग्यावर पोहोच होवून बगाडय़ाची विधीवत पुजा करून या बगाडय़ाने केलेला नवस फेडण्याचा त्याच्या कुटुंबाने आनंद घेतला.
दि. 1 रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान मंदिरातून पालखी दर्शनासाठी बाहेर काढण्यात आली होती. परवानगी नसताना देखील विना परवाना बगाड काढून कोरोना सारख्या रोगाला पसरण्यासाठी एक प्रकारे बावधनकरांनी मदतच केली. असा विश्वास महसूल व पोलीस दलाने मनाशी बाळगून यांनी जवळपास गावातील 100 ते 120 भाविकांवर वाईचे तहसिलदार रणजीत भोसले, ग्रामसेवक शिवाजी दरेकर, गावकामगार तलाठी यांनी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. दाखल झालेले गुन्हे नाथांचा प्रसाद म्हणून गावकऱयांनी आनंदाने स्वीकारले. 144 कलम असतानाही ग्रामस्थांनी बगाड काढल्याने पोलिसांची नाचक्की झाली आहे.








