माजी खासदार पवन वर्मांनाही दणका
नवी दिल्ली
जेडीयू पक्षाध्यक्ष नितीश कुमार यांच्याविरोधात भूमिका घेतलेल्या पवन वर्मा आणि निवडणुकांचे रणनितीकार प्रशांत किशोर यांची जनता दल (युनायटेड) पक्षातून बुधवारी हकालपट्टी करण्यात आली. पक्षविरोधी भूमिकेचे कारण दाखवून दोघांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती जेडीयूचे मुख्य सरचिटणीस आणि राष्ट्रीय प्रवक्ते के. सी. त्यागी यांनी दिली. राज्यसभेचे माजी खासदार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते पवन वर्मा यांनी दिल्लीमध्ये भाजपशी युती करण्यास उघड विरोध दर्शविला असून, पक्ष अध्यक्ष नितीश कुमार यांच्यावरही काही गंभीर आरोप केले होते. प्रशांत किशोर यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध दर्शवत सतत पक्षाच्या बाहेरून वक्तव्य करत होते. गेल्या काही महिन्यापासून पक्षाचे पदाधिकारी असलेले प्रशांत किशोर यांनी काही वादग्रस्त वक्तव्य केली होती जी पक्षाच्या निर्णयाविरोधात होते. तसेच राष्ट्रीय अध्यक्षांच्या विरोधात अपमानास्पद शब्दांचा वापर केला होता, असे त्यागी यांनी सांगितले आहे.








