ऑनलाईन टीम / चंदीगढ :
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे प्रमुख सल्लागार म्हणून निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमरिंदर सिंग यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली.
अमरिंदर सिंग यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, प्रशांत किशोर प्रमुख सल्लागार म्हणून माझ्यासोबत जोडले गेले आहेत. पंजाबच्या जनतेच्या भल्यासाठी एकत्र काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत. त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे.
दरम्यान, यापूर्वी काँग्रेसने प्रशांत किशोर यांच्यावर 2017 मध्ये पाच राज्यांसाठी निवडणूक प्रचाराची रणनीती आखण्याची जबाबदारी सोपवली होती. त्यावेळी पंजाब हे एकमेव राज्य होते जिथे पक्षाला बहुमत मिळवण्यात यश आले. उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात असताना काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. तरीही पक्षाने किशोर यांचे कौतुक केले होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांचे धोरण स्वीकारूनच भाजपने सत्ता मिळवली होती.









