डिचोली/प्रतिनिधी
मये मतदारसंघातील राजकारणाला आता वेगळी दिशा मिळणार असून विद्यमान आमदार प्रवीण झाटय़े हे आज सोमवारी आमदारकीचा राजिनामा देणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मये मतदारसंघात आमदार असताना त्यांना डावलून सध्या पक्षांतर्गत सर्व कार्यक्रम आणि उपक्रम हल्लीच पक्षात घेतलेल्या प्रेमेंद्र शेट यांना पुढे करून सुरू असल्याने तसेच शेट यांची उमेदवारी निश्चित झाल्याने आमदार झांटय़े यांनी हा निर्णय घेतला असल्याचे समजते. मयेत भाजप पक्षाचे आमदार असताना त्यांचे अनेक कार्यकर्ते भाजप मंडळ व विविध समित्या तसेच बुथ समित्यांवर आहेत. हे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी भाजप पक्षाचा त्याग करून झांटय़े यांच्यासमवेत मगो पक्षात जाण्यासाठी सज्ज झालेले आहेत. आमदारकीचा राजिनामा दिल्यानंतर लगेचच ते मगो पक्षात प्रवेश करणार आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.









